सिरोंचा: – ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपवनसंरक्षक कार्यालय,सिरोंचा येथे वनविभागात अतुलनीय काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उपवनसंरक्षक पुनम पाटे यांच्या हस्ते गौरव करून प्रशस्तीपत्र देण्यात आले. त्यात २ वनमजूर, ३४ वनरक्षक, २ वनपाल, २ कार्यालयीन कर्मचारी व १ वनपरिक्षेत्र अधिकारी असे ४१ जणांचा समावेश आहे.
गडचिरोली वनवृत्तात वडसा, गडचिरोली, आलापल्ली,भामरागड आणि सिरोंचा असे पाच वनविभाग असून सिरोंचा वन विभाग हे राज्याच्या नकाशावर वनविभागात भर टाकणारे म्हणून ओळखले जाते. येथे उच्च प्रतीचे सागवान लाकूड मिळत असल्यामुळे या वनविभागाचे नावलौकिक झाले आहे. तसेच सिरोंचा वनविभाग हे वन्यजीव व्यवस्थापनात महाराष्ट्र वनविभागाचे प्रगतीचे पाऊल पुढे घेऊन जात आहे.
या वनविभागात प्राणहिता, कमलापूर, जिमलगट्टा, बामणी, देचली,झिंगाणुर, सिरोंचा आणि आसरअली एकूण आठ वनपरिक्षेत्र कार्यालय आहेत. झिंगानुर,देचली, आसरअली आणि सिरोंचा या वनपरिक्षेत्रातील जंगल नेहमीच तस्करांच्या रडारवर आहे. या वनविभागात अनेकदा वनाधिकारी व कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ले झाल्याचे प्रकरण घडले आहे, किंबहुना वन मजुराला सेवा देत असताना आपला जीव गमवावा लागला.एवढेच नव्हेतर सिरोंचा वनविभागातील बहुतांश परिसर अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त भाग आहे. अशाही परिस्थितीत दोन राज्यांच्या टोकावर वसलेल्या या वनविभागात सेवा देत असताना कर्मचारी व अधिकाऱ्यांची तारांबळ उडते.कधी कधी सेवा बजावीत असताना नक्षल्यांचा सुद्धा सामना करावा लागतो. नुकतेच काही दिवसांपूर्वी कमलापूर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या दुर्गम भागात नक्षल्यांकडून कर्मचारी व अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. एकीकडे तस्कर आणि दुसरीकडे नक्षलवाद अशा खडतर परिस्थितीत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक पूनम पाटे यांनी घेतल्याने नक्कीच पुन्हा जोमाने काम करण्यासाठी या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सकारात्मक ऊर्जा मिळणार हे विशेष.
झिंगानूरचे आरएफओ सागर बारसागडे यांची खडतर परिस्थितीत उत्तम सेवा
या वनविभागातील झिंगानूरचे वनपरिक्षेत्राधिकारी सागर बारसागडे हे गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ झिंगानूर वनपरिक्षेत्राचे नेतृत्व करत असून अत्यंत खडतर परिस्थितीत त्यांनी अतुलनीय काम केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
सदर अधिकारी आणि कर्मचारी यांनी रोपवन कामे, रोपवाटिका कामे, कूप कामे, अतिक्रमण निर्मूलन, जोखीम घेऊन अवैध स्वाग तस्करी रोखणे, दुर्गम भागात अंगार नियंत्रण, रानम्हशी संवर्धन, गिधाड संवर्धन, वन रक्षणसाठी लोक सहभाग या कामात अत्यंत दुर्गम भागात उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून १ वनपरिक्षेत्र अधिकारी सह तब्बल ४१ जणांचा विभाग स्तरावर सन्मान करण्यात आला आहे.
-पूनम पाटे
उपवनसंरक्षक, वनविभाग सिरोंचा