अहेरी:- विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था अहेरी द्वारा संचालित भगवंतराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा उमानुर येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक येथील सरपंच श्रीनिवास गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष येथील मुख्याध्यापक टी सी ओडनालवार, प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिष्ठित नागरिक पोचम संपत,बापू तोडसाम,शंकर गावडे,राजेंद्र अट्टेला, तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण देशात आज 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.खेड्यापाड्यातही हा उत्साह असाच दिसून आला. विविध शाळेत विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी भगवंतराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा,उमनूर येथे ध्वजारोहण होताच सकाळच्या सुमारास सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमात येथील विद्यार्थ्यांनी उत्तम नृत्यकला दाखवून उपस्थित पाहुण्यांना मंत्रमुग्ध केले.
सदर कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक टी सी ओडनालवार यांच्या मार्गदर्शनात शाळेतील शिक्षकांनी कालपासूनच पूर्वतयारी केली होती. पूर्व नियोजनामुळे सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी झाले असून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चिमुकल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.