अहेरी:- आदिवासी विद्यार्थी हे अत्यंत निष्ठावंत तसेच संस्कृतीप्रिय असतात. काही प्रमाणात लाजाळू असले तरी प्रामाणिकता हा विशेष गुण त्यांच्यात आहे. या विद्यार्थ्यांची बुद्धी तल्लक असते. कुठलेही परिश्रम करण्यात ते मागेपुढे पाहत नाही. फक्त त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे.असे सुप्त गुण अनेक विद्यार्थ्यांमध्ये आहे. फक्त त्यांची क्षमता ओळखून त्यांना चालना दिली तर त्यांचा विकास नक्कीच होईल, असे प्रतिपादन भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था,अहेरीचे अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले. भगवंतराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा राजाराम खांदला येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त पूर्वसंध्येला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून येथील माजी सरपंच विनायक आलाम, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष व्यंकटेश अर्का, वनिता आलाम, मंगला आत्राम, सपना मारकवार, ज्येष्ठ नागरिक कोंडय्या केकर्लावार, सुभाष मारगोनवार, नारायण कंबगोनीवार,ऍड रुपाली माकडे,माजी प स सभापती भास्कर तलांडे,विजय अंबिलपवार,नारायण आत्राम,अशोक आत्राम,रंगा आलाम,तिरुपती कुळमेथे, मुख्याध्यापक एम व्ही बासनवार, शिक्षक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण महत्त्वाचे असून खेड्यापाड्यातील प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षण घ्यावे या उदात्त हेतूने भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेतर्फे खेड्यापाड्यात आश्रम शाळा सुरू करण्यात आले आहे. दुर्गम भागात दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर येथील विद्यार्थी तालुका मुख्यालयात येऊन पुढील शिक्षण घेतात.मात्र,यापुढे आश्रम शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना थेट जिल्हा पातळीवर असलेल्या सैनिकी शाळेत मोफत शिक्षण देण्याचा निर्धार केला असून त्यांचा खर्च मी स्वतः उचलनार असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर सर्वांनाच त्या ठिकाणी प्रवेश देणे शक्य नसल्याने अंतिम निकालात अव्वल असलेल्या विद्यार्थ्याला सैनिकी शाळेत प्रवेश मिळणार असून त्यासाठी आतापासूनच नियमित अभ्यास करण्याचे आवाहनही त्यांनी केले.या आवाहनाला चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा उत्तम प्रतिसाद दिला.या सांस्कृतिक कार्यक्रमात आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तम कला दाखविली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक येथील मुख्याध्यापक एम व्ही बासनवार तर सूत्रसंचालन व आभार गोंडाने यांनी केले.