गडचिरोली:- देशाच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर २५ जानेवारीला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून गडचिरोली जिल्ह्यातील झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे यांच्यासह १०६ जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. त्यामध्ये ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण आणि ९१ जणांना पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. ओआरएसचे निर्माता दिलीप महालनोबीस यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातून एक नाव या यादीत आहे, ते म्हणजे “झाडीपट्टीतील दादा कोंडके”
परशुराम खुणे.
परशुराम कोमाजी खुणे हे कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथील रहिवासी असून त्यांनी कला (नाट्य) क्षेत्रात ५००० हून अधिक नाटकांच्या कार्यक्रमांमध्ये ८०० वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. ते गेल्या ५० वर्षापासून झाडीपट्टीच्या रंगभूमीवर रसिकप्रिय विनोदी नट आहेत. आजपर्यंत झाडीपट्टीच्या रंगभूमीवर त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. विशेषता “झाडीपट्टीतील दादा कोंडके” अशीही त्यांची ख्याती आहे.
परशुराम खुणे हे अनेक वर्षे गुरूनोलीचे सरपंच होते,झाडीपट्टी कला मंचचे अध्यक्ष पदही भूषविले तसेच ते अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यही करीत आहेत.त्यांना १९९१ ला महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार, १९९२ ला जादूगार सुनील भवसार स्मृती पुरस्कार, १९९५ ला श्यामराव बापू प्रतिष्ठानच्या कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
खुणे यांच्या सिंहाचा छावा, स्वर्गावर स्वारी, लग्नाची बेडी, एकच प्याला, मरीमायचा भुत्या, लावणी भुलली अभंगाला, मी बायको तुझ्या नवऱ्याची, एक नार तीन बेजार, बायको का मातून गेली? नाथ हा माझा, इत्यादी नाटकातील भूमिका अत्यंत गाजल्या.
पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना “गेल्या ५० वर्षापासून मी झाडीपट्टी रंगभूमीवर कार्यरत आहे त्याचं फलित मला आज मिळालं. हा पुरस्कार मला झाडीपट्टीच्या रसिकांना अर्पण करायचा आहे” असे ते म्हणाले.