गडचिरोली : संविधानाने नागरिक म्हणून वय वर्षे 18 पुर्ण झाल्यावर मतदानाचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे, तो वापरून आपल्या लोकशाहीला अधिक सुदृढ करण्यासाठी मतदान करा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय मीणा यांनी केले. राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्ययासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी संजय मीणा यांनी मतदारांना राष्ट्रीय मतदार दिवसाच्या शुभेच्छा दिल्या व उपस्थितांच्याबरोबर मतदान करणेबाबत शपथ घेतली. यावेळी ते म्हणाले, आजचा दिवस नविन मतदारांसाठी अभिमानाचा दिवस आहे. कारण 1 जानेवारी 2023 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होऊन मतदार म्हणून मतदार यादीत नाव नोंदविल्यामुळे स्वतंत्र भारताचा एक जागृत मतदार म्हणून शासन दरबारी आपली नोंद झालेली आहे. आज पासून यापुढे होणाऱ्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत व ग्रामपंचायत निवडणूकामध्ये मतदान करुन मतदानाच्या अधिकाराचा वापर करून वोट फॉर डेमॉक्रशी हे ब्रिदवाक्य आपल्या उराशी बाळगुन आपण भारत देशाची लोकशाही अधिक सुदृढ करण्यासाठी प्रयत्न कराल अशी मी अपेक्षा करतो. संविधानात उद्देशिकेची सुरूवातच आम्ही भारताचे नागरिक या वाक्याने होते. म्हणजेच नागरिक जो की मतदार आहे, त्याला देशाचे सरकार निवडण्याचा अधिकार दिला आहे. यावरून त्यांनी आपल्या भाषणात मतदारांचे महत्त्व विशद केले. मतदान प्रक्रिया ही आपल्या देशात एक मोठा उत्सव म्हणून पार पाडली जाते. त्या प्रक्रियेत मतदान करून आपला सहभाग सर्वांनी नोंदविणे आवश्यक आहे. मतदानादिवशी सुट्टी असते म्हणून कित्येक जण बाहेर फिरायला जातात. परंतू जर सर्वांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला तर आपण आपल्या निवडीचे शासन निवडू शकतो. यामुळेच खऱ्या अर्थाने लोकशाहीला आपण अधिक मजबूत बनवू असे त्यांनी यावेळी मत व्यक्त केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संजय मीणा यांचेसह प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रकल्प अधिकारी तथा सहा.जिल्हाधिकारी डॉ. मैनक घोष, समाज सेवक देवाजी तोफा, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अति.जिल्हाधिकारी धनाजी पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.निकाळजे, तहसिलदार गडचिरोली महेंद्र गणवीर तसेच इतर विभागातील प्रमुख, अधिकारी, कर्मचारी वर्ग व इतर मान्यवर, नवमतदार, अपंग मतदार, शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मतदारांना मतदानाचा मुलभूत अधिकार वापरण्यासाठी आवाहन केले. तसेच मतदान प्रक्रियेत सहभागी अधिकारी कर्मचारी यांना मतदान ही राष्ट्रीय कार्य म्हणून जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडण्याचे आवाहन केले. समाजसेवक देवाजी तोफा यांनी मतदान व लोकशाहीबाबातचे महत्त्व सांगितले. यावेळी मतदान जनजागृतीबाबत तालुकास्तरावर विविध ठिकाणी चित्रकला व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यातील विजेत्यांना प्रशस्तीपत्रक वाटप करण्यात आले. जिल्हयातील मतदार यादीत यावेळी नव मतदारांची नोंदणी झाली ते पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. त्यापैकी निवडक चार जणांना आजच्या कार्यक्रमात ओळखपत्र वाटप करून पुष्पगुच्छ देण्यात आले. तसेच निवडणूक प्रक्रिया बळकट करण्याकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे योगदान बहुमूल्य आहे. यातील निवडक अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनाजी पाटील यांनी केले. आभार तहसिलदार महेंद्र गणवीर यांनी मानले. सुत्रसंचलन निवृत्त नायब तहसिलदार देवेंद्र दहीकर यांनी केले.
गडचिरोली जिल्हातील एकुण 8,00,625 स्त्री/पुरूष मतदारांची नोंद मतदार यादीत केलेली आहे. भारत निवडणूक आयोगाने ऑनलाईन पध्दतीने मतदार नोंदणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. तसेच दिनांक 01.01.2023 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत दिनांक 05 जानेवारी 2023 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीमध्ये 13,577 नविन मतदाराचा समावेश झालेला असुन 6,338 नवमतदारांची (वय 18-19 वर्ष) नोंदणी करण्यास जिल्हा प्रशासनाने यश मिळविलेले आहे. मतदार नोंदणीसाठी एका वर्षात 4 संधी येतात. जर तुम्ही 2023 च्या जानेवारी, एप्रिल, जुलै, ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेला किंवा त्याच्या आधी 18 वर्षाचे होणार असाल तर त्या- त्या तिमाहीत अर्ज क्र.06 भरुन मतदार नोंदणी करु शकता. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकामध्ये 50% पेक्षा जास्त जागा महिला उमेदवारांकरीता आरक्षीत ठेवण्यात येत असल्यामुळे महीला सक्षमीकरणासाठी योग्य व पात्र असलेल्या महिला उमेदवारांना मतदार नोंदणी करुन निवडणूक प्रकीयेत भाग घेता येतो. जिल्हातील शाळा व महाविद्यालयांमध्ये मतदार साक्षरता क्लब व चुनाव पाठशाला कार्यान्वीत करण्यात आलेल्या आहेत. जिल्हातील शाळा, महाविद्यालय, गोंडवाना विद्यापीठ येथील शिक्षक/प्राध्यापक व प्राचार्य यांनी साक्षरता क्लबचे माध्यमातून निवडणूक विषयक मतदार नोंदणी व मतदानाबाबत जनजागृती करतात.