भामरागड:- गोटुल हे आदिवासी तरुणांच्या संस्कारांचं आणि शिक्षणाचं मध्यवर्ती केंद्र असून याठिकाणी आयुष्यात शिस्तबद्ध जीवन कसं जगायचं, संगीत, समाज व्यवस्था, नृत्य, लग्नविधी, समाज शिक्षण,सामाजिक संस्कार, नातं-सन्मान, अपराधाबद्दल शिक्षा, सामूहिक पूजापठण, वन निर्मिती व वनरक्षण, प्राणी सुरक्षा अशा अनेक प्रकारच्या शिक्षणाची कित्ते गोटूलातून गिरविले जातात. समाज व्यवस्थेचं संपूर्ण संचालनच गोटूलद्वारे केलं जातं.त्यामुळे गोटुल भवनातून प्राचीन संस्कृतीचे दर्शन होणार असल्याचे प्रतिपादन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले. ते भामरागड तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत होणाऱ्या नूतन गोटुल भवन भूमिपूजन प्रसंगी उदघाटक म्हणून ते बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता,प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम,तहसीलदार अनमोल कांबळे,गट विकास अधिकारी स्वप्नील मगदुम, सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोषना चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर,माजी प स समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे भामरागड तालुका अध्यक्ष रमेश मारगोनी,शहर अध्यक्ष रमेश बोलमपल्लीवार,आदिवासी सेवक सब्बरबेग मोगल,पंकज सुरजागडे तसेच आरेवाडा येथे सरपंच यमुनाबाई तानू सडमेक आणि मलमपोडूर येथे सरपंच रोशन वड्डे,उपसरपंच संतोष भुरसे,माजी सरपंच लच्चूराम दुर्वा,प्रतिष्ठित नागरिक रामा वड्डे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार आत्राम यांनी तारुण्याचे विधीनिषेध, संसारी आणि संस्कारी जीवन, समाजासाठी कोणत्या गोष्टी पोषक आणि कोणत्या घातक आहेत, याची शिकवण इथेच मिळत असल्याने एक संस्कारक्षम आणि प्रशिक्षित युवा पिढी या गोटूलातूनच बाहेर पडते.त्यामुळे समाजबांधवांनी नवीन गोटूल भवनाचा पुरेपूर उपयोग करावा असे आवाहन आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.तालुक्यातील आरेवाडा आणि मलमपोडुर या दोन ठिकाणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड तर्फे लाखो रुपयांच्या निधीतून नवीन गोटूल भवन बांधकाम होणार आहे.याचा समाजबांधवांना नक्कीच खूप मोठा फायदा होणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.