चंद्रपूर :- भद्रावती तालुक्यात गेल्या अठ्ठावीस वर्षापूर्वी सुमारे बाराशे हेक्टर जमीन संपादित करून सुध्दा या ठिकाणी होणारा प्रस्तावित निप्पॉन डेन्ड्रो प्रकल्प सुरू झाला नाही. यामुळे येथील प्रकल्पग्रस्त आणि तालुक्यातील जनतेत या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या सुमारे बाराशे हेक्टर जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यामुळे अठ्ठावीस वर्षापासून रखडलेल्या निप्पॉन डेन्ड्रो प्रकल्पा करीता संपादित केलेल्या बाराशे हेक्टर जमिनी संदर्भात केंद्र व राज्य शासन तसेच प्रशासनाने आपली भुमिका लवकरात लवकर स्पष्ट करावी. तसेच या जागेवर नवीन प्रकल्प उभारल्या जात नसल्यास शेतकऱ्यांच्या जमिनी तात्काळ परत करण्यात याव्या. अशी मागणी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांनी केली आहे.
रविंद्र शिंदे पुढे म्हणाले की, २८ वर्षापूर्वी माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भद्रावती शहराच्या दक्षिणेला सात किमी अंतरावर निप्पॉन डेन्ड्रो ह्या विज प्रकल्पाचा भुमी पुजन सोहळा पार पडला. या प्रकल्पासाठी पिपरी ( देश. ), ढोरवासा, तेलवासा, कुनाडा, टोला, चारगाव, विजासन, लोणारा व चिरादेवी शिवारातील सुमारे बाराशे हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. परंतु अठ्ठावीस वर्षाचा प्रदिर्घ कालावधी लोटूनही या ठिकाणी कुठलाही प्रकल्प सुरू झाला नाही. या ठिकाणी अमुक प्रकल्प येणार , तमुक कारखाना सुरू होणार अश्या चर्चा यापूर्वी झालेल्या आहे.परंतु प्रत्यक्षात कुठलाही प्रकल्प या ठिकाणी सुरू झाला नाही . यामुळे येथील जनतेची व विशेषत : प्रकल्पग्रस्त परीवार, शेतकरी आणि सुशिक्षित बेरोजगारांची वेळोवेळी थट्टा करण्यात येत आहे. शासन व प्रशासनाने ही घोर थट्टा थांबवावी. असे रविंद्र शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे.
सततच्या अतिवृष्टीमुळे या परीसरातील जनता त्रस्त झालेली आहे. शेत पिकांचे फार मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जिवीत हानी होत आहे. उच्च शिक्षित तरूणांच्या हातात काम नसल्याने त्यांची मानसिकता खालावत आहे.परीसरातील कोळसा खाणी बंद होत आहे. काही सुरु असलेल्या कोळसा खाणीतील समस्यांची श्रृखंला थांबण्याचे चिन्हे दिसत नाही. प्रस्तावित खाजगी कोळसा खाण प्रकल्पात स्थानिकांना किती प्रमाणात सामावून घेणार ही बाब अनिश्चीत आहे. या सर्व समस्यांना येथील जनतेला सामोरे जावे लागत असतांना , निप्पॉन डेन्ड्रोची स्थिती भिजत घोंगडे सारखी आहे. या परिस्थितीत अठ्ठावीस वर्षापासून रखडलेल्या निप्पॉन डेन्ड्रो प्रकल्पा करीता संपादित केलेल्या बाराशे हेक्टर जमिनी संदर्भात केंद्र व राज्य शासन तसेच प्रशासनाने आपली भुमिका लवकरात लवकर स्पष्ट करणे आवश्यक आहे. तसेच या जागेवर नवीन प्रकल्प उभारल्या जात नसल्यास शेतकऱ्यांच्या जमिनी तात्काळ परत करणे सर्वांच्या हिताचे असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांनी म्हटले आहे.