अहमदनगर (अण्णासाहेब चौधरी) अहमदनगर जिल्हा प्रशासनाने नव्याने सुरू केलेल्या अमृत जवान सन्मान योजना 2022 अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांचे कुटुंब व कार्यरत सैनिकांचे प्रशासनाकडे प्रलंबित असलेली शासकीय कामांचा जलद गतीने निपटारा होणार असून सैनिकांसाठी ही एक संधी उपलब्ध झाल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. जिल्हा प्रशासनातर्फे 7 फेब्रुवारी ते 23 एप्रिल या 75 दिवसांच्या कालावधीसाठी राबविण्यात येणा-या अमृत जवान सन्मान अभियान 2022 उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सैनिक कल्याण विभागाचे संचालक प्रमोद यादव, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, कर्नल श्री. जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संदीप निचित उपस्थित होते.
श्री. पवार पुढे म्हणाले, आजी माजी सैनिकांनी अमृत जवान सन्मान अभियानाकडे प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी एक चांगली संधी म्हणुन पहावे. या 75 दिवसांच्या अभियानात शासकीय कामे जलदरित्या व प्राधान्याने निपटारा होणार आहे. त्याचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले. गावांतील तसेच तालुक्यातील सैनिकांनी, संघटनांनी एकत्र येऊन आपला सहभाग या अभियानात नोंदवावा. एकत्र येऊन गावांतील वाद गावातच सोडविण्यासाठी प्रयत्न करावा. आपआपसात वाद झाला तर समस्या निर्माण होतात. त्यामुळे अनेक वर्ष वाद मिटत नाही. वेळ, पैसा खर्च होतो. असे होऊ नये यासाठी गावागावांतील सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
सैनिक कल्याण विभागाचे संचालक प्रमोद यादव आपल्या मनोगतात म्हणाले सैनिकांसाठी आमचा विभाग वेगवेगळे उपक्रम आयोजित करून त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करत असतो. विविध सैनिक संघटनांनी कोव्हिड काळात चांगले काम केले आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात असे अभियान राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, कर्नल श्री. जाधव यांनी आपले मनागत व्यक्त केले.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आपल्या प्रास्ताविकात म्हणाले, सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावून निःस्वार्थीपणे देशाची सेवा केली आहे व करत आहेत. त्यांची सेवा व समर्पण विचारात घेता त्यांचे मनोबल उंचावणे व त्यांचा उचित सन्मान करण्यासाठी हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
अमृत महोत्सवा निमित्ताने तसेच राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा नुकल्याच झालेल्या वाढदिवसाचे निमित्ताने अभियानाचे आज उद्घाटन होत आहे. जिल्ह्यात दि. 7 फेब्रुवारी ते 23 एप्रिल 2022 दरम्यान 75 दिवस एक पथदर्शी कार्यक्रम म्हणुन राबविण्यात येणार आहे. त्यानंतर हे अभियान पुढे सुध्दा असेच सुरू राहील. या अभियानाचा उद्देश वंचित घटकांपर्यंतला पोहचविणे. मागील वर्षी महसूल विभागाने महसूल विजय सप्तपदी अभियान 7 फेब्रुवारी रोजी सुरू केले होते. हे अभियान यशस्वी झाले आहे. या अनुषंगानेच आज अमृत जवान सन्मान अभियान सुरू करत आहोत.
अहमदनगर जिल्हयात 15 हजारापेक्षा जास्त माजी सैनिक असून, माजी सैनिकांच्या विधवांची संख्या जवळपास 3 हजार, तसेच शहीद सैनिकांच्या कुटुंबांची संख्या 50 आहे. माजी सैनिकांवर अंदाजे 5 हजार कुटुंबीय अवलंबून आहेत.
यातील ज्या आजी माजी सैनिकांचे विविध विभागाकडे प्रलंबित असलेले शासकीय कामे या माध्यमातून निकाली निघू शकतील. सैनिकांप्रती आस्था व आपुलकी असल्यामुळे हे अभियान राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. हे अभियान जिल्ह्यासह राज्यभर व देशभर राबविल्या जाईल. असा विश्वास मला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरूपात 5 माजी सैनिकांना दुरूस्त सातबा-याचे वाटप करून अभियानाला सुरूवात झाली. कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. परिवेक्षाधीन उपजिल्हाधिकारी नूतन पाटील यांनी आभार व्यक्त केले.