जबाबदार कोण?नागरिकांचा सवाल
देसाईगंज– शहराच्या कोकडी मार्गांवरील नैनपुर वार्डा लगत नगर परिषदेच्या डंम्पिंग यार्ड समोरील वनविभागाच्या नर्सरीला राञी ९:३० च्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयाची वनसंपदा जळुन राख झाल्याने यास जबाबदार कोण?असा प्रश्न आता नागरिकांतुन उपस्थित केल्या जाऊ लागला आहे.
शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कोकडी मार्गांवर वडसा वन विभागाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून नर्सरी तयार करण्यात आली आहे. या नर्सरीत वन विभागाकडून यथायोग्य संरक्षण व संवर्धन करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात विविध प्रजातीची वृक्षवल्ली बहरु लागली होती.
दरम्यान काल ता.३१ मे च्या राञी ९:३० च्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयाची वनसंपदा जळुन राख झाल्याने तर्क वितर्कांना उत आले आहे. विशेष म्हणजे मागच्या वर्षी याच दरम्यान ७ जुलै रोजी डंम्पिंग यार्डला लागलेल्या आगीत नगर परिषदेची लाखो रुपये किमतीची मालमत्ता जळुन राख झाली होती. सदर आग कशामुळे लागली हे अद्यापही गुलदस्त्यातच असताना काल ता.३१ मे च्या राञी लागलेल्या अचानक आगीवरुनही आता तर्क वितर्कांना चांगलेच उधाण येऊ लागले असुन सदर आग लावण्यात आली की लागलेली?याबाबत संभ्रम अद्यापही कायम आहे.
तथापी घटनेची माहिती मिळताच वनाधिका-यांनी घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ नगर परिषदेच्या अग्नीशमन दलास पाचारण करुन आग आटोक्यात आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला.आग आटोक्यात आणण्यात यश आले असले तरी कुणाच्या तरी चुकीमुळे दरवर्षी लाखो रुपयाची वनसंपदा जाळुन नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या जात असल्या तरी आग लावणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात वन विभागाच्या वनाधिकाऱ्यांना अद्यापही यश आले नसल्याने एकुणच कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह लावल्या जाऊ लागले आहेत.
वडसा वन विभागाच्या देसाईगंज वन परिक्षेत्रा अंतर्गत वडसा-कोकड़ी मार्गावर असलेल्या नर्सरी ला काल रात्री उशिरा अचानक भयंकर आग लागली. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे, उन्हाळा लागला असल्याने उन्हाळ्यात धान पिकाचे शेज जाळुन आग लागल्याची वन परिक्षेत्र अधिकारी विजय धांडे यांनी सांगितले आहे.