चंद्रपूर : जातीच्या दाखल्याविना कोणतेही काम होत नव्हते. अखेर महसूल विभागाच्या वतीने कार्यक्रम घेत त्यात भद्रावती तालुक्यातील १०० टक्के लोकांना जातप्रमाणपत्रासह इतर लोकांना विविध दाखले देण्यात आले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहात होता.
याप्रसंगी आमदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष भद्रावती अनिल धानोरकर, उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसीलदार भद्रावती सोनवणे, मुख्याधिकारी नगर परिषद भद्रावती पिदूरकर, सुधीर मुळेवार, सुरज गावंडे यांची उपस्थिती होती.
आमदार प्रतिभा धानोरकर या मतदार संघातील शेवटच्या वर्गाचा विकास करण्याकरिता आग्रही असतात. त्यांच्या पाठपुराव्यामुळे या समाजाला जात प्रमाणपत्र मिळाले आहे.तहसील कार्यालय भद्रावती यांच्या विद्यमाने पारधी उत्थान कार्यक्रम विशेष मोहिमेअंतर्गत आदिवासींच्या प्रश्नांवर बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातून आदिवासी पारधी उत्थान कार्यक्रम निश्चित झाला. त्यातून आयोजित शिबिरात जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, २० संजय गांधी निराधार महिलांना योजनेचे प्रमाणपत्र, शेतकरी आत्महत्या ग्रस्त पत्नीला १ लाख रुपयाचा धनादेश आदीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आधी तालुक्यातील २४ पैकी २४ लाभार्थ्यांना जातप्रमाणपत्र देण्यात आले होते. आता भद्रावती येथील १०० टक्के लाभार्थ्यांना जातप्रमाणपत्र देण्यात आले आहे.
पारधी समाज हा अत्यंत मागासलेला व वंचित समाज आहे. शिक्षणाचे प्रमाण हे अत्यंत तुरळक असल्याकारणाने या समाजाची प्रगती होत नाही. या समाजात शिक्षण नसल्यामुळे व गरिबीमुळे हा समाज विकासापासून कोसो दूर राहिला आहे. पारधी समाजातील बहुतांशी लोकांना राहायला जागा नाही, घर नाही, उद्योगधंदे ची साधने नाहीत, नोकरी नाही, जातीचे दाखले रेशन कार्ड रहिवासी दाखला नसल्या कारणामुळे त्यांना अनेक हाल-अपेष्टा सामोरे जावे लागते. या समाजातील लोकांना त्यांच्यासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती मिळत नाही. कारण त्यांच्या पर्यंत या योजना पोहोचत नाही, आणि हे पारधी लोक तीत पर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे शासनाने त्यांच्या दारापर्यंत जाण्याची गरज असून मेळाव्याच्या माध्यमातून अशा दुर्लक्षित घटकाला न्याय देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले.