भद्रावती : महाविद्यालयातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना विशेष मदत व्हावी यासाठी विवेकानंद महाविद्यालयात अनेक वर्षापासून विद्यार्थी दत्तक योजना राबविली जाते. यासाठी सर्व प्राध्यापक दरमहा विशिष्ठ निधी जमा करून त्यामधून काही शैक्षणिक साधने विद्यार्थांना उपलब्ध करून देतात. या विभागाद्वारे चालू शैक्षणिक सत्रामध्ये विद्यार्थी दत्तक योजने अंतर्गत प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांच्या अध्यक्षतेखाली युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षणविभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र पुरस्कृत “करियर कट्टा “या योजनेचा लाभ 20 विद्यार्थ्यांंना करून देण्यात आला . करियर कट्टामध्ये ‘आयएएस आपल्या भेटीला’ या उपक्रमात राज्य पातळीवरील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती , बँकिंग सेवा , स्टाॅफ सिलेक्शन कमिशन व युपीएससी परीक्षेचे मार्गदर्शन मिळणारं आहे. तसेच उद्योजक आपल्या भेटीला या उपक्रमात उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास , व्यवस्थापकीय कौशल्य व प्रत्यक्ष उद्योजकाचे मार्गदर्शन, वित्त व्यवस्थापन , निर्णय क्षमता, जोखीम व्यवस्थापन, मनुष्यबळ व साधनसामुग्री व्यवस्थापन व आधुनिक तंत्रज्ञान इत्यादी बाबत सतत तीन वर्षे विद्यार्थ्यांच्या ध्येयपूर्तीसाठी मार्गदर्शन मिळत राहणार आहे. या योजनेसाठी होतकरू आणि गरीब 20 विद्यार्थ्यांची महाविद्यालयाने निवड करून त्यांची फी दत्तक योजनेद्वारा भरली आहे. विद्यार्थी दत्तक योजनेच्या समन्वयक डॉ. ज्योती राखुंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आणि दत्तक योजनेची आता पर्यंतची वाटचाल विषद केली. विद्यार्थी करिअर कट्टाचे समन्वय डॉ. गजानन खामनकर यांनी ‘करिअर कट्टा’ ची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमाचे संचालन सौरभ चामाटे याने तर आभारप्रदर्शन आनंद पंडिले याने केले. कार्यक्रमास प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.