गडचिरोली : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोलीच्या जिल्हा क्रीडा संकुलात ‘भगवान बिरसा कला संगम २.०’ या राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचा भव्य शुभारंभ झाला. केंद्रीय जनजातीय कार्यमंत्री जुएल ओराम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
गडचिरोलीची निवड ही बदलत्या परिस्थितीचे प्रतीक आहे. एकेकाळी नक्षलवादामुळे राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी आव्हानात्मक असलेल्या या जिल्ह्यात आज देशस्तरीय जनजातीय गौरव दिन साजरा होत आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे केंद्रीय मंत्री जुएल ओराम यांनी सांगितले. आदिवासी क्रांतिवीरांचा इतिहास, त्यांचे शौर्य आणि सांस्कृतिक वारसा राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी केंद्र शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आदिवासी कलाकारांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच खरा जनजातीय गौरव असल्याची भावना मंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केली. या महोत्सवासाठी राज्यभरातून सुमारे ४० हजार कलाकारांनी नोंदणी केली असून त्यापैकी निवड झालेल्या अडीच हजार कलाकारांना गडचिरोलीत राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
या महोत्सवात पारंपरिक लोकनृत्य, गायन, वाद्यवादन, हस्तकला यांसह रील्स, माहितीपट, ब्लॉग आणि लघुपट अशा आधुनिक डिजिटल कलाविष्कारांचाही समावेश आहे. प्रसिद्ध अभिनेते भरत गणेशपुरे यांनी आदिवासी बांधवांनी आपली मातृभाषा, संस्कृती आणि परंपरांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष नाट्यप्रयोगासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सवात रंगत आणली.
दरम्यान, उद्या १५ नोव्हेंबर रोजी गडचिरोलीत देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे या सोहळ्याचे उद्घाटन करून मार्गदर्शन करणार आहेत. राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे.













