सावनेर, दि. १४ ऑक्टोबर : सावनेर तालुक्यातील गडमी येथे १४ वर्षीय मुलीचा राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (१४ ऑक्टोबर) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे गडमी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत मुलीचे नाव लावण्या विठ्ठल गोळंगे (वय १४, रा. गडमी, ता. सावनेर, जि. नागपूर) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती गावकऱ्यांनी खापा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांना दिली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते हितेश दादा बनसोड यांच्या हितज्योती आधार फाउंडेशनच्या पथकाने घटनास्थळी मदतकार्य केले.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह सावनेर येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. तेथे वैद्यकीय तपासणीनंतर मुलीला मृत घोषित करण्यात आले.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुलीच्या मृत्यूची परिस्थिती आणि त्यामागील कारणांचा शोध खापा पोलीस घेत आहेत. पोलिसांच्या तपासातूनच घटनेची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.अल्पवयीन मुलीच्या मृत्यूच्या या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, पुढील तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.








