*
राजुरा, वार्ताहर –
वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती – धोपटाळा टाऊनशिप येथे आज सकाळी 9 वाजता सांडपाणी व भूमिगत सिवरेज टाकी, गटर साफ करण्यासाठी आत गेलेले कंत्राटी कामगार व वेकोलि कामगार गॅसमुळे बेशुद्ध झाले. ही माहिती बाहेर असलेल्या कामगारांना मिळताच त्यांना तातडीने बल्लारपूर क्षेत्रीय दवाखान्यात नेण्यात आले. यापैकी दोन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला असून तीन कामगारांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना चंद्रपूर येथील दवाखान्यात हलविण्यात आले आहे. त्यापैकी सुशील कोरडे याला नागपूर येथे भरती करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती – धोपटाळा टाऊनशिपमध्ये सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कंत्राटी कामगार दहा फूट खोल असलेली टँक साफ करण्यासाठी उतरले होते. बराच वेळ होऊनही ते न आल्याने आणि आवाज दिल्यानंतर कोणताही प्रतिसाद न दिल्याने कंपनीचा एक कर्मचारी टँक मध्ये उतरला. तो ही वर न आल्याने व आवाजाला प्रतिसाद न दिल्याने वर असलेले कामगार घाबरले आणि त्यांनी शेजारच्या लोकांना माहिती दिली. यानंतर तातडीने टँक वरील स्लॅप जेसीबीच्या सहाय्याने काढले. यावेळी तीन कंत्राटी कामगार व एक वेकोलि कामगार बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसले. त्यांना बाहेर काढण्यासाठी रामपूर ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी शंकर आंदगुला खाली उतरले आणि उपस्थितांच्या मदतीने सर्वांना बाहेर काढले. जखमी मजुरांना रुग्णालयात नेले असता ५-७ मिनिटांनी शंकर आंदगुला हेही बेशुद्ध पडले. त्यांना वेकोलिच्या रुग्णालयातही नेण्यात आले. एकूण पाच कामगार या दुर्घटनेत सापडले आहेत. यापैकी उपचारांना दाद न देता कंत्राटी राजू जंजर्ला व सुभाष खंडाळकर या दोघांचा मृत्यू झाला. वेकोलिचे कामगार सुशील कोरडे यांना नागपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. वेकोलि कर्मचारी प्रमोद वाभिटकर, रामपूर गावातील कंत्राटी सफाई कामगार शंकर आंदगुला यांचेवर उपचार सुरू आहेत. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत साखरे यांनी बंदोबस्त ठेवला.
विशेष म्हणजे एवढी मोठी दुर्घटना घडूनही बल्लारपूर क्षेत्रीय मुख्य महाप्रबंधक यांचे कार्यालय काही मीटरच्या अंतरावर असतांना दुर्घटना स्थळावर अथवा दवाखान्यात एकाही वरीष्ठ अधिकाऱ्याने भेट दिली नाही. मात्र वेकोलिच्या कामगार संघटनांचे पदाधिकारी तातडीने घटनास्थळी आले आणि मदत कार्यात सहभाग घेतला. माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी चंद्रपूर येथे दवाखान्यात भेट देऊन जखमीची माहिती घेतली.