चंद्रपूर : महानगर पालिकेतील भाजपचे माजी गटनेता, सभागृह नेता वसंत देशमुख, नगरसेवक सतीश घोनमोडे यांनी भिवापूर, मातानगर परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मनपा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाने नगरसेवकांना पक्षात घेऊन भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे, स्थायी समिती सभापती निवडणुकीनंतर देशमुख भाजपच्या नेतृत्वावर नाराज होते. यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी देशमुख यांच्या घरी भेट देत पक्षात येण्याचा प्रस्ताव दिला होता.