गडचिरोली: लहानपणापासूनच शिक्षणाची प्रचंड आवड.स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याचे स्वप्न. मात्र घरची परिस्थिती बेताची.अशाही परिस्थितीत जिद्दीने अभ्यास करत शेतकऱ्याच्या लेकीने प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी हे पद खेचून आणले आहे.
प्रियंका परेश बर्मन रा.खुद्दीरामपल्ली, ता. मुलचेरा,जिल्हा गडचिरोली असे तिचे नाव असून वडील शेतकरी आणि आई खुद्दीरामपल्ली येथे पोलीस पाटील आहे.प्रियंका बर्मन हिचे पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण लगतच एक किलोमीटर अंतरावरील नेताजी सुभाषचंद्र हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय सुंदरनगर येथे झाला.त्यानंतर पदवीचे शिक्षण मुलचेरा तालुका मुख्यालयातील नेताजी सुभाषचंद्र विज्ञाय महाविद्यालयात झाला.त्यानंतर तिने पॅरामेडिकल तंत्रज्ञानाचे शिक्षण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथे पूर्ण केले.
मागील काही दिवसापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू असताना सरळ सेवा अंतर्गत डिसेंबर २०२३ मध्ये तिने ह्या पदाची परीक्षा दिली.३ सप्टेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाच्या पुणे आरोग्य विभागातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.यात तिने खुल्या प्रवर्गातून बाजी मारली. कागदपत्र पडताळणी व समुपदेशन झाल्यावर तिची चंद्रपूर जिल्ह्यात नियुक्ती झाली आहे.चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ती आता सेवा बजावणार आहे.
विशेष म्हणजे पॅरामेडिकल तंत्रज्ञानाचे शिक्षण झाल्यावर ती कामाचा अनुभव घेत अभ्यासात देखील सातत्य राखला.नुकतेच तिने मुलचेरा तालुका मुख्यालयात आपला स्वतःचा लॅब देखील सुरु केला आहे.प्रियंका बर्मन ने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्दीने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली.तिची प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदी निवड झाल्याने सर्व स्तरावरून तिचे कौतुक केले जात आहे.