मुलचेरा: शहरासारखे सोई-सुविधा, उत्तम मैदान नसतानाही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ग्रामीण भागातील तरुण विविध क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतात. एवढेच नाही तर योग्य मार्गदर्शन नसतानाही ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये चांगला खेळ करण्याची प्रचंड क्षमता आहे. जर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण भागातूनही उत्तम खेळाडू घडतील असा आशावाद आलापल्लीचे उपवनसंवरक्षक राहुल सिंह तोलीया यांनी व्यक्त केला.
मुलचेरा तालुक्यातील सुंदरनगर येथे नेताजी सुभाषचंद्र फुटबॉल कमिटी तर्फे आयोजित भव्य आंतरराज्यीय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे प्रमुख बक्षीस वितरक म्हणून ते बोलत होते.यावेळी स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते बबलू भैय्या हकीम,प्रमुख पाहुणे म्हणून शाहीन हकीम, डॉ. लुबना हकीम, उपविभागीय वनाधिकारी पवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप साखरे, प्राचार्य डॉ. रंजीत मंडल,प्राचार्य विठल निकुले,सेवानिवृत्त प्राचार्य शैलेंद्र खराती, माजी जि.प.सदस्य रवींद्र शहा,ग्रामपंचायत सदस्य निखिल इज्जतदार, नेताजी सुभाषचंद्र फुटबॉल कमिटीचे अध्यक्ष रंजीत स्वर्णकार, जिवन दत्त,पत्रकार महेश गुंडेटीवार तसेच सुंदरनगर येथील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना आपल्या भागात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.मात्र,मुलचेरा तालुक्यात फुटबॉल खेळाला विशेष महत्त्व दिले जाते.इतर तालुक्यांच्या मानाने मुलचेरा आणि चामोर्शी या दोन तालुक्यात जणू फुटबॉल खेळाचा ज्वर असल्याचे दिसून येते. खेळ कुठलाही असो त्यात सातत्य ठेवल्यास नक्की यश प्राप्त होते.त्यामुळे तरुण वर्गाने शिक्षणासोबतच विविध खेळ खेळले पाहिजे. असे मोलाचे मार्गदर्शन देखील त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम यांनी सुंदर नगर सारख्या ठिकाणी गेली ४० वर्षापासून फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. ही अभिमानाची बाब असून दरवर्षी विविध राज्यातील खेळाडू या ठिकाणी आपला उत्कृष्ट खेळ सादर करतात त्यामुळे आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना त्याचा मोठा फायदा होत असतो. खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी परिसरातील हजारो प्रेक्षकांची उपस्थिती असते हे देखील तितकाच महत्वाचं आहे. विशेष म्हणजे सुंदरनगर येथील लहान मुलापासून तर महिला, पुरुष सर्व एकत्रित येऊन ही स्पर्धा यशस्वी करतात. यातून देखील एक महत्त्वाचा संदेश सर्वांना मिळतो. त्यातून सर्वांना एकोपा दिसून येतो. ४० वर्षांची परंपरा कायम राखण्यात कमिटीचा मोलाचा योगदान असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले.
गेली आठवडाभरापासून सुरू असलेल्या आंतरराज्य फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना ३ सप्टेंबर रोजी सुंदरनगर आणि गोविंदपुर मध्ये झाला.यात सुंदरनगर चमूने अत्यंत सुंदर असा खेळ करत ४-१ ने गोविंदपुर वर विजय मिळविला. या स्पर्धेसाठी जवळपास ३४ संघांनी सहभाग नोंदविला होता.अंतिम सामना होताच मान्यवरांच्या हस्ते आकर्षक शिल्ड आणि रोख रक्कम देण्यात आले. यावेळी मुलचेरा, चामोर्शी आणि अहेरी तालुक्यातील हजारो प्रेक्षक उपस्थित होते.