आलापल्ली:पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी खास चिमुकल्यांसाठी तान्हा पोळा साजरा केला जातो.आधुनिक युगात व ऑनलाइनच्या काळात आपली रूढी, प्रथांची चिमुकल्यांना माहिती राहावी त्याकरिता असे आयोजन करणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम व्यक्त केले.
आलापल्ली येथील श्रीराम मंदिर कमिटी तर्फे आयोजित भव्य तान्हा पोळा उत्सवच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प.स.सदस्य हर्षावर्धन बाबा आत्राम, सरपंच शंकर मेश्राम, उपसरपंच विनोद अक्कनपल्लीवार, मंदिर कमिटीचे विजय गुप्ता,राजेश गोयल,धनंजय पडिशालवार,गणेश गुप्ता,महावीर अग्रवाल तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना तान्हा पोळयाच्या दिवशी सर्व लहान मुले व मुली लाकडाच्या बैलाला सजवून त्याची मिरवणूक काढतात. बैल सजविण्यासाठी कितीतरी दिवस आधीपासूनच त्यांची लगबग सुरू झालेली असते.विशेष म्हणजे विदर्भात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. बालगोपालांच्या आनंदावर विरजण न पडू देता श्रीराम मंदिर कमिटीने गेल्या ४० वर्षापासून ही परंपरा कायम ठेवली आहे.ही अभिमानाची बाब आहे.श्रीराम मंदिरात अनेक मोठमोठे कार्यक्रम,सण, उत्सव साजरे केले जातात त्यामुळे येथे विकास होणे गरजेचे आहे. मंदिर विकासासाठी नियोजन करा, निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली.
दरम्यान तान्हा पोळा उत्सवात जवळपास ५३ बालगोपालांनी विविध वेशभूषा परिधान करून नंदीबैल सजवून आपली उपस्थिती दर्शविली होती. त्यातील पाच स्पर्धकांची निवड करून प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले.यात कृश चिमरालवार यांनी प्रथम पारितोषिक पटकाविले,दुसरे पारितोषिक कृष्णा तुडूंलवार,तिसरे शिवम गुणवे,चवथा शिवंश ढेकाटे आणि पाचवा पारितोषिक सार्थक पाकलवार यांनी पटकाविले. मंत्री धर्मराव बाबा आत्राम व मंदिर कमिटीच्या वरिष्ठ मान्यवरांकडून याची मुघल यांना पारितोषिक देण्यात आले.