गडचिरोली:एसटी महामंडळाच्या चालत्या एसटीचा चाक निखळल्याची घटना नागेपल्लीत घडली आहे. सोमवारी दुपारी १२.४० च्या सुमारास आलापल्ली-अहेरी मार्गावर प्रवास करताना नागेपल्ली येथील राजे धर्मराव पटांगणासमोर ही घटना घडली. चालक व प्रवाशांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
प्राप्त माहितीनुसार अहेरी आगाराची एमएच-४० ए क्यू-६०७१ या क्रमांकाची एसटी बस १९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान प्रवासी घेऊन सिरोंचा येथून अहेरीकडे निघाली होती.दरम्यान आलापल्ली येथील बस स्थानकात काही प्रवाश्यांना उतरविल्यावर दुपारी १२.३० च्या सुमारास ती बस आलापल्ली वरून अहेरीकडे निघाली.मात्र नागेपल्ली गाव ओलांडल्यावर राजे धर्मराव कॉलेज जवळ धावत्या एसटीच्या डाव्या बाजूची चाक निखळली.
धावत्या एसटी बस मधून आवाज येत असल्याने वाहन चालक परसुटकर आणि वाहक पुंगाटी यांनी बस थांबवून बघितले असता त्यांना मागच्या डाव्या बाजूचे एक चाक निखळल्याचे लक्षात आले.एसटीच्या मागेच काही अंतरावर रस्त्याच्या कडेला पाण्याच्या खड्ड्यात चाक पडल्याचे निदर्शनास आले.ही माहिती कळताच प्रवासी तात्काळ बाहेर पडले आणि इतर वाहनांचा आधार घेऊन घर गाठले.चाक सोबतच नट बोल्ट देखील निघाले होते.मागील डाव्या बाजुला एकच चाकेवर बस उभी होती.दुसरी चाक निखळली असती तर प्रवाशांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला असता.मात्र चालकाच्या प्रसंगावधानाने जीवितहानी टळली.
चालक आणि वाचकाने ही माहिती अहेरी आगाराला कळविले मात्र,तेंव्हापर्यंत चालक आणि प्रवाश्यांची भंबेरी उडाली होती.या पूर्वी देखील एसटीचा व्हिडीओ व्हायरल झाला.त्यात अहेरी आगाराच्या एका चालत्या बसचे छप्पर उडाले होते, तर चालकाच्या एका हातात व्हायपर तर दुसऱ्या हातात स्टेअरिंग असलेला व्हिडीओ देखील व्हायरल झाला तर नुकतेच पावसात एसटी बस अक्षरशः गळत असल्याने प्रवाश्यांना चक्क छत्री घेऊन बसावे लागले.गडचिरोली जिल्ह्यातील भंगार बससेवेमुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.