अहेरी:-जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनातर्फे विविध लोककल्याणकारी योजना राबविले जातात.या व्यतिरिक्त गडचिरोली पोलीस दलातर्फे देखील विविध योजना राबविण्यात येतात.त्या प्रत्येक शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपली उन्नती साधा असे आवाहन झिंगानूर उपपोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अभिजित तुतूरवाड यांनी केले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित भव्य जनजागरण मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
यावेळी उदघाटक सरपंच नीलिमा मडावी,प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उप निरीक्षक अभिजित घोरपडे,मानबतुलवार,कस्तुरवार,प्रतिष्टीत नागरिक सीरिया मडावी,दासू मडावी,पोच्या मडावी,पेंटा कुळमेथे,पत्रकार रामचंद्र कुमरी,शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक कुमरे तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यात ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त छत्तीसगड सीमेवरील झिंगानुर उप पोलीस स्टेशन मध्ये देखील पोलीस अधीक्षक निलोत्पल,अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता,यतीश देशमुख,एम रमेश उप विभागीय पोलीस अधीक्षक संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनात भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याचे मान्यवरांनी गडचिरोली पोलीस दलातर्फे सुरू असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देऊन पोलीस दादालोरा खिडकी तर्फे दुर्गम भागातील नागरिकांना कशाप्रकारे लाभ देण्यात येत आहे याची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर झिंगानुर उप पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या विविध दुर्गम गावातील महिलांना साडीचोळी,नागरिकांना मच्छरदाणी,रेनकोट,युवा वर्गाला टी शर्ट,शेतकऱ्यांना शेतीउपयोगी साहित्य आणि विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पन्नास रोपट्यांची लागवड करून संगोपनाची जबाबदारी घेण्यात आली.