अहेरी:-हिंदू पंचागानुसार, नागपंचमी श्रावण शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. यंदा नागपंचमीचा सण ९ ऑगस्टला म्हणजेच आज साजरा होत आहे. नागपंचमीला भगवान शंकराच्या पूजेबरोबरच गळ्यात असणाऱ्या नागदेवतेचीही पूजा केली जाते. नागपंचमी हा सण नाग किंवा नाग देवतेची पूजा करण्यासाठी समर्पित केला जातो. या दिवशी नागदेवतेच्या स्मरणार्थ विविध विधी आणि पूजा केल्या जातात. विशेष म्हणजे नागपंचमी श्रावण मासातील पहिला सण असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आलापल्ली ते सिरोंचा रस्त्यावरील नाग मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.
आलापल्ली पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर सिरोंचा मार्गावर नागदेवता मंदिर आहे. या मंदिरात वर्षभर भाविकांची मांदियाळी असते. दर शनीवारी व सोमवारी तर या ठिकाणी मोठी गर्दी उसळते.एवढेच नव्हे तर भाविक नवस सुध्दा फेडतात.दरवर्षी नागपंचमीला या ठिकाणी मोठी जत्रा भरते.चारही बाजूला जंगल व निसर्गरम्य वातावरण आहे. सध्या पावसाळा असल्याने हिरवगार जंगल मनाला मोहित करून जात आहे. आज पहाटेपासूनच या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. या परिसरातील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेत आहेत.
नागदेवता मंदिर येथे मोठी जत्रा भरत असल्याने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये त्यामुळे पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले असून या ठिकाणी पोलिसांसह सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आले आहे.तसेच नाग देवता सेवा समिती व ट्रस्ट तर्फे खबरदारी घेण्यात येत आहे.
येथे भरणाऱ्या जत्रेमुळे स्थानिकांना देखील मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला विविध दुकान लागले आहे.तर मंदिर ट्रस्ट आणि विविध पक्षांकडून महाप्रसादाचे वितरण देखील केले जात आहे.