गडचिरोली:- जिल्ह्यातील सिरोंचा वनविभाग हे मौल्यवान सागवानासाठी प्रसिद्ध आहे. तीन राज्यांची सीमा असलेल्या या वनविभागातील मौल्यवान सागवान जंगलावर परराज्याची विशेषतः तेलंगाना आणि छत्तीसगड राज्याची वक्रदृष्टी पडली आहे. त्यामुळे येथे मागील अनेक वर्षापासून सागवान तस्करी सुरूच आहे. सिरोंचा तालुक्यात सध्या पूर परिस्थिती असून तालुक्यातील विविध नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीतही नदी नाल्यातून सागवान तस्करी केली जात आहे. वनविभागाला गुप्त माहिती मिळताच तब्बल ४ लाख रुपयांचे सागवान लाकूड जप्त करण्यात आले. मात्र तस्करांचा यावेळी डाव फसला असला तरी आरोपी अद्यापही मोकळे आहेत. त्यामुळे ‘पुष्पा’ अभी झुका नही हे स्पष्ट झाले आहे.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार ३० जुलै रोजी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील झिंगानुर वनपरिक्षेत्रातील येडसील उपक्षेत्रात वाहत असलेल्या नदी पात्रातून अवैधरित्या सागवान तराफे वाहून तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच झिंगानूर वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी पकडली.वाहत असलेल्या पाच तराफयातून तब्बल ३० नग सागवान लाकूड त्यांनी जप्त केले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडलेली सागवान ५.६६३ घनमीटर असून त्याची किंमत ४ लाख ९ हजार ६० रुपये एवढी आहे. सध्या नदी नाल्यांना पूर आल्याने जंगलातील मौल्यवान सागवान लठ्ठे वाहून जाताना सर्वांनाच दिसत आहेत.मात्र हे सागवान लठ्ठे वनविभागाने कापून बीटात साठवलेले आहेत की, तस्करीसाठी अवैधरित्या कापलेले आहे ? हे तर चौकशी अंतिम समोर येईल.मात्र सागवान तस्कर अद्यापही मोकाटच असल्याचे दिसून येत आहे.
सिरोंचा वनविभागात सिरोंचा आसरअली, देचली, बामणी, जिमलगट्टा, झिंगानुर, कमलापूर आणि प्राणहिता असे एकूण आठ वनपरिक्षेत्र कार्यालय आहेत. यातील सिरोंचा, आसरअली, देचली आणि झिंगानूर या वनपरिक्षेत्रातील जंगल तस्करांच्या रडारवर आहे. हे तर गेली अनेक वर्षापासून घडत असलेल्या विविध घटनांवरून दिसून येत आहे. सिरोंचा वनविभागातील सागवान तस्करीवर अंकुश लावण्यासाठी वन विभागाने किती प्रयत्न केले असले तरी भर पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या नदी नाल्यातून तराफ्याच्या साह्याने सागवान तस्करी होत असेल तर हिवाळा आणि उन्हाळ्यात काय परिस्थिती असेल याचा विचार न केलेला बरा.
झिंगानुर वनपरिक्षेत्रात झिंगानुर, येडीसिली,सिरकोंडा,मंगीगुडम असे चार उपक्षेत्र असून हा तस्करीचा प्रकार येडीसिली उपक्षेत्रातील नदीत सुरू होता. लगतच छत्तीसगड राज्याची सीमा असून या ठिकाणी प्राणहिता नदी तुडुंब भरून वाहत आहे. या परिस्थितीत देखील सागवान तस्कराकडून मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे. वनविभागाला लक्षात येताच तब्बल ४ लाखाचे सागवान पकडले असले तरी सागवान तस्करी करणारा ‘पुष्पा’ मात्र अजूनही झुकल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे या भागात सक्रिय असलेली सागवान तस्करीची आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केंव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.