अहेरी: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या पुढाकारातून पहिल्यांदाच अहेरी राजनगरीत भव्य दिव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ४ ऑगस्ट रोजी राजवाडा अहेरी येथे सदर शिबिर संपन्न होणार असून या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांनी केले आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्र हा अतिदुर्गम भाग असल्याने येथील विविध आजारांच्या रुग्णांना जिल्हा मुख्यालय किंवा चंद्रपूर, नागपूर सारख्या शहरात जाऊन उपचार घेणे शक्य नसल्याने मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या पुढाकारातून ‘मावा स्वास्थ मावा अधिकार’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमातुन खेड्यापाड्यातील रुग्णांची शोध घेऊन योग्य उपचार व औषधोपचार केले जात आहे. या दरम्यान अनेक वयोवृद्ध आणि इतर नागरिकांमध्ये नेत्रदोष, मोतीबिंदू सारखे आजार दिसून आल्याने या रुग्णांना एकाच दिवशी व एकाच ठिकाणी योग्य उपचार व सल्ला मिळावं या उदात्त हेतूने अहेरी येथील राजवाड्यात येत्या ४ ऑगस्ट रोजी भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे या शिबिरात नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी व मोफत उपचार तसेच औषधी वाटप केले जाणार आहे. या शिबिरात डॉ. ध्रुबोज्योती साहा व डॉ.स्नेहा अग्रवाल या तज्ञांकडून तपासणी व औषधोपचार केले जाणार आहे. त्यासाठी जयत तयारी देखील केली जात आहे. येत्या १ ऑगस्ट पासून रुग्णांनी आपल्या नावाची नोंदणी करावी व सदर शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे.