गडचिरोली: जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अहेरी तालुक्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि महाराष्ट्र – तेलंगाणा या दोन राज्यांना जोडणाऱ्या आंतरराज्यीय पुलाजवळ (वांगेपल्ली) गावात रस्त्यावर भला मोठा खड्डा निर्माण झाल्याने नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. चार चाकी वाहनधारकांना देखील अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती.अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी सकाळीच यंत्रणांना अलर्ट करून तात्काळ खड्डे बुजविण्यासाठी रस्त्यावर उतरल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
अहेरी तालुका मुख्यालयातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून पावसाळ्यात या खड्ड्यांमधून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र आणि तेलंगाना राज्याला जोडणारा प्राणहिता पुलाजवळ वांगेपल्ली गावातील मुख्य चौकात भला मोठा खड्डा तयार झाल्याने त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून त्या खड्ड्याला तलावाचे स्वरूप आले होते. या खड्ड्यातून वाहने काढताना खड्डा किती खोल आहे याचा अंदाज येत नव्हता त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. लगतच्या तेलंगाणा राज्यातील कुमरमभीम जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे बस देखील अहेरी पर्यंत धावतात.त्यांना देखील याच खड्ड्यातून प्रवाश्यांना घेऊन ये-जा लागत आहे. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन स्वतः अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी नुकतेच घेतलेल्या आढावा सभेत सदर खड्डा बुजविण्याचे संबंधित विभागाला स्पष्ट निर्देश दिले होते.मात्र सदर खड्डा बुजविण्यात न आल्याने सोमवारी (२३ जुलै) रोजी सायंकाळच्या सुमारास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद बांधकाम विभागाला तात्काळ खड्डा बुजविण्याचे सक्तीचे निर्देश दिले.
स्वतः ते खड्डे बुजवण्यासाठी उपस्थित राहणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग खडबडून जागे झाले आणि जेसीबी,ट्रॅक्टर लावून बोल्डर,गिट्टी टाकून तात्काळ खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले. यावेळी ऑन स्पॉट उभे राहून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यावरच अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे हे त्या ठिकाणाहून परतले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता बडवंत रामटेके, जिल्हा परिषद बांधकाम विभाग अहेरीचे उप अभियंता रविकिरण पारेलवार, वीज वितरण विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता सुधीर हेडाऊ, मंडळ अधिकारी एकनाथ चांदेकर,तलाठी सचिन मडावी आदी उपस्थित होते.
इतरही खड्डे बुजविण्याचे स्पष्ट निर्देश
अहेरी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत येत असलेल्या अहेरी, सिरोंचा एटापल्ली आणि भामरागड या चार तालुक्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची त्यांनी आढावा बैठक अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.तर पूर परिस्थिती नंतर उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी यंत्रणांना सज्ज केले. पूर ओसरल्यावर मच्छर होऊ नये म्हणून गावात फवारणी करणे, हॅन्डपंप, विहिरी आदी पिण्याच्या पाण्याचे स्रोत ब्लिचिंग टाकून विहित पद्धतीने स्वच्छ करावी, रस्त्यावरील खड्डे बुजवून घ्यावे, विद्युत प्रवाह सुरळीत करावी असे सक्तीचे निर्देश दिले. एवढेच नव्हे तर सर्वच कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहण्याचे स्पष्ट निर्देश दिले.