गडचिरोली : शुक्रवारपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याच्या दक्षिण देखील अतिवृष्टी निर्माण झाली आहे. सिरोंचा तालुक्यात गोदावरी, प्राणहिता नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. शिवाय गोदावरी नदीवर तेलंगाना सरकार ने मेडीगड्डा धरण बांधले आहे.या भागात देखील पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जिल्हाधिकारी संजय दैने व जिल्हा पोलिस अधिक्षक निलोत्पल यांनी आज हेलिकॉप्टरमधून पाहणी केली. यावेळी त्यांनी गोदावरी व प्राणहिता नदी व त्यावरील धर्मपूरी पूलाची पाहणी केली.
जिल्हाधिकारी दैने यांनी पुरपरिस्थिती ओसरल्यानंतर करावयाच्या उपाययोजनासंबंधी तहसिल कार्यालय, सिरोंचा येथे तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतला. साथरोग पसरू नये याची काळजी घेणे, पिण्याच्या पाण्याचे स्रोत विहित पद्धतीने स्वच्छ करणे, डास प्रतिबंधक फवारणी करणे, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पूर पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना गर्दी करण्यापासून परावृत्त करणे, नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांना गरजेनुसार शेल्टर होम मध्ये स्थलांतरित करण्यासाठी तत्पर राहणे, वीजा चमकत असतांना झाडाखाली आश्रय न घेण्याबाबत जनजागृती करणे आदी बाबींवर जिल्हाधिकारी यांनी यंत्रणेला सूचना दिल्या.
याप्रसंगी अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक एम. रमेश जिल्हा आपत्ती सल्लागार कृष्णा रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक, गटविकास अधिकारी अनिलकुमार पटले, तहसीलदार श्री तोटावार तसेच तालुकास्तरीय यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.