गडचिरोली:- अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे हे सोमवारी 22 जुलै रोजी एटापल्ली तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पूर परिस्थितीची पाहणी करतानाच अतिदुर्गम अश्या तोडसा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली.
अहेरी उपविभागात मागील तीन ते चार दिवसात दमदार पाऊस झाल्याने अतिवृष्टी निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांची शेती पाण्याखाली गेली, घरांची पडझड झाली, काही ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने मार्ग देखील बंद झाले आहेत.पूर ओसरल्यावर देखील दूषित पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण केली जात आहे. त्यामुळे त्यांनी स्थानिक तहसील कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा सभा घेऊन तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान त्यांनी तोडसा येथे भेट देऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली.
यावेळी त्यांनी येथील आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत अडचण जाणून घेतली. त्यात प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत गळत असल्याचे लक्षात आले तर अत्यंत महत्त्वाचा असा सौर ऊर्जेचा प्लांट बंद असल्याचे देखील लक्षात आले. यादरम्यान त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची व आजारांची माहिती घेतली आणि रुग्णांना कुठलेही त्रास होणार नाही याबाबत योग्य काळजी घेण्याचे निर्देश दिले.
तोडसा प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण 8 उपकेंद्र असून त्यातील 4 उपकेंद्र अतिदुर्गम भागात आहेत.या प्राथमिक आरोग्य केंद्राचे एकूण 24 हजार 500 एवढी लोकसंख्या असून अत्यंत कठीण परिस्थितीत येथील आरोग्य अधिकारी कर्मचारी रुग्णांची सेवा करीत असल्याचे आढळून आले.
भेटी दरम्यान तहसीलदार हेमंत गांगुर्डे, गटविकास अधिकारी डॉ. आदिनाथ आंधळे, पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी मडावी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन कन्नाके, येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. राकेश नागोसे,डॉ. संतोषी लाड,डॉ. मेहेरआरती हरकरे, आरोग्य सहाय्यक नन्नावरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सिडाम आरोग्य सेविका मा देशी वेलादी परिचर बोटरे व दुर्गे उपस्थित होते.