अहेरी:- उपविभागातील एटापल्ली तालुक्यात जुलै महिन्यात नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या तीन जणांच्या वारसांना तब्बल १२ लाखांची मदत देण्यात आली. येथील तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांच्या विशेष प्रयत्नातून तात्काळ याच महिण्यात मदत मिळाली आहे. तिन्ही मृतांच्या वारसांना अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आले.
नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्यांना व मृतांच्या वारसांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येत असते.जुलै महिन्यात एटापल्ली तालुक्यात तीन विविध घटना घडल्या.त्यात २ जुलै २०२४ रोजी अमित डोलू तिम्मा रा. तोडसा हा पुराच्या पाण्यात वाहून गेला होता.तर चंदू गिरमा पोरतेट रा.जिवनगट्टा याचा वीज पडून मृत्यू झाला होता.तर ८ जुलै रोजी अंकुश पांडू कुळयेटी रा.मरपल्ली याचा नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला होता.
नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या इसमांच्या वारसांना तात्काळ शासनाची मदत मिळावी या उदात्त हेतूने येथील तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांनी विशेष प्रयत्न केले. विशेष म्हणजे तिन्ही घटना जुलै महिन्यात घडल्या असून याच जुलै महिन्यात त्यांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्यात आली.२२ जुलै रोजी तोडसा, जीवनगट्टा, मरपल्ली या तिन्ही गावात मृतांच्या वारसांची भेट घेऊन अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी प्रत्येकी चार लाखांचे धनादेश वितरित केले.
यावेळी तहसीलदार हेमंत गांगुर्डे गटविकास अधिकारी डॉ.आदिनाथ आंधळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन कन्नाके, पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी मडावी,तलाठी पी एन उसेंडी,पी डी आत्राम,कोतवाल देवाजी गावडे,सुरेश दुर्गे,सचिन गेडाम आधी गावकरी उपस्थित होते.