गडचिरोली:उन्हाळी सुटी संपत असताना सोमवार (१ जुलै) पासून विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यातील शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी गजबजणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात होत असल्याने अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. ढोलताशांच्या गजरात व विद्यार्थ्यांचे औक्षण करून,पहिले पाऊल, शाळा स्तरावर सेल्फी पॉईंट, प्रवेशोत्सव सोहळा, असे विविध उपक्रम घेऊन नवागतांचे स्वागत केले जाणार आहे.त्याची जय्यत तयारी शालेय प्रशासनाने केलेली आहे.
शालेय स्तरावर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ला सुरवात होत आहे. १ मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेत प्रवेशाचे वेध लागलेले होते. यादरम्यान उन्हाळी सुटी असल्याने शालेय प्रांगणात शुकशुकाट झालेला होता. परंतु आता शैक्षणिक वर्षाला सुरवात होत असल्याने पुन्हा एकदा शालेय परिसर विद्यार्थ्यांनी गजबजणार आहे. तत्पूर्वी शालेय प्रशासनाकडून शाळेचा परिसर तसेच वर्ग खोल्या स्वच्छ करण्याची लगबग गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरु होती. तसेच सोमवारी शाळा भरणार म्हटल्यावर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी फलक लेखन व इतर सजावटीची पूर्वतयारी सुरु झाली.
अनेक शाळांकडून प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा करण्याचे नियोजन आखले असून, शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय असाच राहणार आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यात एकूण १४७०जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहेत.तर ३२२ खाजगी शाळा आहेत.नवीन शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या जवळपास १ लाख ९ हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे संच वितरित करण्यात येणार आहे. सर्वेक्षणानुसार या शैक्षणिक सत्रात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीत १३ हजार ४५० इतके नवीन प्रवेशित विध्यार्थी दाखल होणार असून शाळेच्या पहिल्याच दिवशी नवी पुस्तके त्यांना हाताळण्यास मिळणार आहे. तसे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे.
शाळा सुरू होण्यापूर्वी वर्ग खोल्यांची स्वच्छता, रंगकाम, किरकोळ डागडुजी पूर्ण झाली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित होण्याच्या दृष्टीने सर्व नियोजन करण्यात आले आहे. नवागतांच्या स्वागतासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पूर्ण तयारी केली आहे.जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.एस.पवार यांनी केले आहे.
असे आहे शाळांचे नियोजन
दरवर्षीप्रमाणे यंदा देखील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे औक्षण करत, बॅण्ड पथकाच्या घोषात स्वागत केले जाणार आहे.काही शाळा गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. नवीन विद्यार्थ्यांसाठी शाळेत खेळीमेळीचे वातावरण तयार करण्यासाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे शाळांकडून आयोजन करण्यात येणार आहे.विध्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोफत पुस्तके, साहित्य वाटपाचे शाळांनी नियोजन केले आहे.काही शाळा प्रवेशद्वारावर स्वागत कमानी उभारणार आहेत.तर काही शाळांनी प्रांगणात सेल्फी पॉइंट साकारून सर्वांचे लक्ष वेधणार आहे. एकंदरीत नवीन शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी प्रवेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार असल्याचे दृश्य निर्माण झाले आहे.
वरिष्ठ अधिकारी देणार भेटी
१ जुलै रोजी शाळा स्तरावर प्रवेशोत्सव व शाळा पूर्वतयारी मेळावा क्र- २ चे आयोजन करण्यात येत आहे. इयत्ता पहिली ला दाखल पात्र बालकांसाठी शाळा पूर्वतयारी अभियानाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. बालकांना शाळेत प्रवेश घेताना उत्साहवर्धक व आनंददायी वातावरण दिसले तर त्याचा शाळेकडे ओढा अधिक वाढेल त्या अनुषंगाने शैक्षणिक सत्र २०२४-२५ च्या पहिल्याच दिवशी नव्याने प्रवेश प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात येणार आहे.याची योग्य अंमलबजावणी करून व त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी दिले आहे.
त्याअनुषंगाने स्वतः कार्यालय प्रमुख, गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख यांनी ठरवून दिलेल्या किमान दोन भेटी देणार आहेत.