गडचिरोली:जिल्ह्यातील दक्षिण भागात भर पावसात रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा अजब प्रकार समोर आलाय.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते विकासाचे काम सुरू असले तरी सध्या पावसाळा असल्याने डांबरीकरणाचे काम करता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली अंतर्गत येत असलेल्या जिमलगट्टा ते देचलीपेठा रस्त्यावर किष्टापूर ते सिंधा पर्यंत जवळपास ६ ते ७ किलोमीटर डांबरीकरण काम केले जात आहे.मागील अनेक वर्षापासून या रस्त्यावर नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर रस्ते विकास कामाला कोट्यवधी रुपये मंजूर करण्यात आले. मात्र संबंधित कंत्राटदाराने भर पावसाळ्यात डांबरीकरणाचे काम सुरू केल्याने हा रस्ता किती दिवस टिकणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यापूर्वी देखील रस्त्याच्या कामात मुरूम ऐवजी मातीचा वापर केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला होता. सध्या डांबरीकरणाचे काम सुरू असून त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणतेही अधिकारी उपस्थित नसल्याने संबंधित कंत्राटदार मनमानी कारभार करत असल्याचे दिसून येत आहेत.विशेष म्हणजे ढगाळ वातावरण आणि पावसात रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा अजब प्रकार समोर आला आहे.विशेष म्हणजे डांबरीकरण सुरू असलेल्या परिसरातील खड्ड्यात पाणी देखील साचला आहे.
——————-
सदर काम सुरुवातीपासूनच अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. आता या भागात पावसानेही हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसात केलेले डांबरीकरण कसे टिकणार ? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावर यांनी उपस्थित केला आहे.