गडचिरोली:जंगल परिसरात पुन्हा अवैध रेतीचे ढिगारे दिसून येत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कारवाई नंतर देखील भामरागड तालुका मुख्यालयात अवैध रेती तस्करी सुरू असल्याचे दिसून येत आहे. शहरापासून हाकेच्या अंतरावर विविध जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध रेती साठवून ठेवल्याने आता रेतीचे नवीन ढिगारे कोणाचे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रेतीघाट नसल्याने बरेच ठिकाणी अवैध रेती तस्करी जोमात सुरू आहे.भामरागड तालुका मुख्यालयात देखील सर्रासपणे पर्लकोटा नदीपात्रात चक्क रस्ता तयार करून राजरोसपणे नदी पोखरली जात असल्याच्या गुप्त माहितीवरून ३१ मे रोजी अहेरीचे उपविभागीय अधिकारी आदित्य जिवने यांनी चक्क जंगल परिसरात धाड टाकून तब्बल ११६ ब्रॉस रेती जप्त केली.या कारवाई नंतर देखील या ठिकाणी सर्रासपणे रेती तस्करी सुरू असल्याचे चित्र आहे.
ताडगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या हेमलकसा उपक्षेत्रात ३१ मे रोजी ही कारवाई करण्यात आली होती.आता भामरागड वनपरिक्षेत्रात अवैध उत्खनन सुरू असून येथील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे ढिगारे साठवून ठेवण्यात येत आहे.आरेवाडा रोड एच पी गॅस गोडाऊन कडे जाताना डाव्या आणि उजव्या बाजूच्या जंगल परिसरात,राजे धर्मराव हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय रोड सार्वजनिक समाधी जवळ देखील अवैध रेतीचे ढिगारे आहेत. एवढ्या मोठ्या कारवाईनंतर देखील सर्रासपणे अवैध रेती उत्खनन होत असेल तर या तस्करांना आशीर्वाद कोणाचा ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे महसूल आणि वन विभागाच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
उपविभागीय अधिकारी आदित्य जिवने यांनी ताडगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या हेमलकसा उपक्षेत्रात केलेल्या कारवाईनंतर आता रेती तस्करांनी आपला मोर्चा भामरागड वनपरिक्षेत्रात वळविल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे वनविभागाच्या हद्दीतच रेती साठवून ठेवली आहे. पावसाळ्यात येथील नद्या तुडुंब भरून वाहत असल्याने येथील तस्कर रेतीचा पूर्वनियोजन करत असल्याचे बोलले जात आहे. मात्र स्थानिक महसूल आणि वन विभाग याकडे हेतूपरस्पर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.