भंडारा :- शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर ध्यान विक्री करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांची पैसे मागील काही महिन्यांपासून दिले गेले नाहीत. शेतकऱ्यांची चूक नसताना विनाकारण त्यांची अडवणूक करून पैसे थांबवू नका. स्वतःचे पगार थांबवा पण शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे पैसे ताबडतोब द्या, अशा स्पष्ट शब्दात खासदार सुनील मेंढे यांनी पणन विभागाच्या अधिकाऱ्यांना खडसावले.
जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे विविध विषयांच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अनेक विषया संदर्भात खा सुनील मेंढे यांनी आढावा घेतला. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांच्या पैशाचा विषय निघाल्यानंतर खासदार चांगले आक्रमक झाले. अनेक केंद्रांच्या माध्यमातून धान विक्री करणाऱ्या बहुसंख्य शेतकऱ्यांची चुका-याचे पैसे अजून पर्यंत देण्यात आलेले नाही. वारंवार सूचना करूनही पैसे शेतकऱ्यांना दिले जात नसल्याने खासदारांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी आणि पणन विभागाचे प्रबंध संचालक यांना चांगलेच धारेवर धरले. बैठकीतूनच प्रबंध संचालकांना भ्रमणध्वनीवर यासंदर्भात जाब विचारला. शेतकऱ्यांचे पैसे अडविण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? त्यांची चूक नसताना त्यांचे पैसे थांबवू नका. प्रसंगी स्वतःचे पगार थांबवून शेतकऱ्यांना पैसे द्या अशा कडक शब्दात खासदारांनी यावेळी अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयाकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांचे पैसे कसे देता येतील यासंदर्भात निर्णय घ्यावा असे निर्देशही खासदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या सोबतच भंडारा जिल्ह्याच्या मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामा संदर्भात असलेल्या अडचणी आणि इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने संदर्भात असलेल्या अडचणींवरही यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील बऱ्याच शेतकऱ्यांचे हप्ते मिळालेले नाही. ही योजना महसूल विभागाकडे असताना शेतकऱ्यांच्या बाबतीत टाळाटाळ केली गेली. महसूल विभागाकडून ही योजना आता कृषी विभागाकडे हस्तांतरित झाली असून शेतकऱ्यांना होणारा त्रास आणि मिळत नसलेल्या हप्त्या संदर्भात कारणे शोधून अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने कारवाई करण्याचे निर्देश खासदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिले.