अहेरी:- प्रत्येकाला आपले कौतुक झाले पाहिजे, आपल्या कामाची प्रशंसा झाली पाहिजे, असे वाटते. त्यासाठी वयाचे बंधन नाही. व्यक्तीचे कितीही वय झाले तरी त्याला कौतुक आवडतेच. आपल्या कामाबद्दल आपला गौरव होणे ही अभिमानास्पद बाब आहे. पुरस्कार मिळणे म्हणजे चांगले काम केल्याची एक प्रकारची पावती असते. पुरस्काराने व्यक्तीचा उत्साह तर वाढतोच शिवाय इतरांना आणि त्या व्यक्तीला देखील चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
धर्मराव कृषी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अहेरी येथील उपक्रमशील शिक्षिका जयश्री खोंडे यांचे मुंबई येथे 5 सप्टेंबर शिक्षक दिनी राज्य शासनाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राज्य आदर्श शिक्षिका जयश्री खोंडे पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर प्रथमतः अहेरीत आगमन करताच त्यांना अहेरी येथील राणी रुक्मिणी महालात पाचारण करून माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी ते पुरस्कार मिळणे ही अहेरीकारांसाठीच नव्हेतर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार काढले.
त्यांनी मिळालेल्या प्रशस्तीपत्र न्याहाळत पुष्पगुच्छ देऊन खोंडे दाम्पत्याचे स्वागत केले तर यापुढेही सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात असेच काम करून उंच शिखर गाठण्याचे शुभेच्छा ही दिले. राणी रुक्मिणी महाला विद्यापीठ मॉडेल कॉलेज गडचिरोलीचे माजी प्राचार्य डॉ. विजय खोंडे, धर्मराव कृषी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल भोंगळे, पर्यवेक्षक युवराज करडे, प्राचार्य डॉ मारोती टिपले,प्राध्यापक ननावरे,आतीश दोंतुलवार,शिवा दोंतुलवार आदी उपस्थित होते.