अहेरी:- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेद्वारे नागरिकांच्या घरातील नाळाला मागील काही दिवसांपासून नारु सदृश्य जंतू येत असल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अहेरी शहराला प्राणहिता नदीपात्रातून पाणी पुरवठा केला जातो. प्राणहिता नदीपात्रातून येणारे पाणी मुख्य लाईनने भुजंगरावपेठा येथील जलशुद्धिकरण केंद्रात आणले जाते. तेथे शुद्धिकरण प्रक्रिया करून पाणी शहराच्या विविध भागात पोहोचवले जाते. जल शुद्धिकरण केंद्रात शुद्ध केलेल्या पाण्यामध्ये मागील आठवड्यापासून नारु सदृश्य जंतू आढळून येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शुद्धिकरण केंद्रातून जलवाहिनीमार्गे नारूसदृश्य जंतू शहराच्या विविध भागातील टाक्यांमध्ये पोहचत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जलशुद्धीकरण केंद्रामधून वायुव्हिजन प्रक्रिया, अवसादन प्रक्रिया करुन पाणी शहरातील विविध भागात पोहचवल्या जाते. प्रक्रिया केलेले पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात. मात्र काही दिवसांपासून या स्वच्छ पाण्यात नारुसदृश्य जंतू आढळून येत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरणपसरले आहे.
पाणी व्यवस्थापन अधिकारी व पाणीपुरवठा विभागामार्फत त्वरित यावर उपाययोजना करून नागरिकांचे आरोग्याची काळजी घेण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे.