भामरागड :- भामरागड वनविभागांतर्गत येत असलेल्या अतिसंवेदनशील, आदिवासीबहूल मन्नेराजाराम व बाम्हनपल्ली उपक्षेत्रातील अनेक आदिवासींचे वनहक्क दावे मागील पंधरा वर्षापासून प्रलंबित होते. सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांच्या नेतृत्वात अन्यायग्रस्त शेतक-यांनी भामरागडचे उपवनसंरक्षक शैलेष मीना यांची भेट घेत समस्या निकाली काढण्याची मागणी केली. याची तत्काळ दखल घेत उपवनसंरक्षकांनी वनाधिका-यांना कागदपत्रातील त्रुटी दूर करुन मोका चौकशी करीत वनहक्क दावे देण्याचे निर्देश दिले. यामुळे बाम्हनपल्लीसह या परिसरातील शेतक-यांचा वनहक्काचा प्रश्न मार्गी लागला आहे.
भामरागड वनविभागातील मन्नेराजा वनपरिक्षेत्रातील बाम्हनपल्ली उपक्षेत्रातील बाम्हणपल्ली बिटातील अनेक शेतक-यांनी 2005 पासून वनहक्कासाठी दावे टाकले होते. मात्र वनविभागाच्या जाचक अटीमुळे अनेकांची दावे नामंजूर करण्यात आले. अन्यायग्रस्त शेतक-यांनी कागदपत्रांच्या पुर्ततेसह वनविभागाच्या अधिका-यांकडे निवेदन सादर करुन वनहक्क दावे निकाली काढण्याची अनेकदा निवेदनातून विनंती केली. मात्र पंधरा वर्षानंतरही सदर दावे निकाली निघाले नाही. संबंधित अन्यायग्रस्त आदिवासी शेतक-यांनी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचेसमोर समस्या मांडली. तत्काळ ताटीकोंडावार यांनी अन्यायग्रस्त शेतक-यांना घेऊन थेट भामरागड वनसंरक्षक कार्यालय गाठून उपवनसंरक्षक शैलश मीणा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
अन्यायग्रस्त शेतक-यांची मागील अनेक वर्षापासून प्रलंबित समस्या त्यांचेसमोर मांडण्यात आली. चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत उपवनसंरक्षक शैलश मीणा यांनी संबंधित वनाधिका-यांना मोका चौकशी करुन अन्यायग्रस्त शेतक-यांच्या वनहक्क दाव्यांचा प्रश्न निकाली काढण्याचे निर्देश दिले. या आदेशामुळे बाम्हनपल्ली परिसरातील जवळपास 45 शेतक-यांचा वनहक्क दावे प्राप्त होणार असल्याने त्यांनी ताटीकोंडावार यांचेसह उपवनसंरक्षकांचे विशेष आभार मानले.