भामरागड : पैशाच्या कारणावरून सुरू झालेल्या भांडणात लोखंडी रॉडने वार करून बांधकाम मजुराची हत्या केल्याची घटना रविवार, २७ ऑगस्ट रोजी भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे घडली. या घटनेमुळे लाहेरीसह परिसरात खळबळ उडाली आहे. सुनील उर्फ रुपेशकुमार भीमटे (वय ४५) रा. किरणापूर जि. बालाघाटा (मध्यप्रदेश) असे मृतकाचे नाव आहे.
लाहेरी येथ मागील वर्षीपासून एकलव्य शाळा व वसतिगृहाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी परराज्यातील मजूर लाहेरी येथे वास्तव्यास आहेत. या बांधकामावर अनेक मजूर काम करीत आहेत. रविवारी रात्रीच्या सुमारास जेवण झाल्यानंतर काही मजुरांमध्ये पैशाच्या कारणावरून वाद सुरू झाल्याची माहिती आहे. भांडणामध्ये रागाच्या भरात सुनील उर्फ रुपेशकुमार भीमट याच्या छातीवर लोखंडी रॉडने वार केल्यामुळे तो जागीच ठार झाल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून अधिक तपास लाहेरी पोलीस करीत आहेत.