गडचिरोली:कर्मचारी कार्यालयीन वेळेवर उपस्थित न राहणे,कामात दिरंगाई करणे, निष्काळजीपणा दाखवणे व वारंवार सुचना देऊनही काहीच सुधारणा होत नसल्याने अहेरीचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे अहेरी उपविभागातील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
29 फेब्रुवारी 2020 पासून राज्यातील सरकारी कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. शनिवार आणि रविवारी दोन दिवस वगळता इतर पाच दिवस दररोज 45 मिनिटाचे वाढीव काम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करावयाचा आहे.त्यासाठी सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 अशी वेळ ठरवून दिली आहे.असे असताना देखील येथील कार्यालयातील कर्मचारी वेळेवर उपस्थित न राहणे,कामात दिरंगाई करणे अश्या बाबी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे आता लेटलतीफपणा आणि निष्काळजीपणा कर्मचाऱ्यांना चांगलाच भोवणार आहे.
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी 24 जुलै रोजी येथील पदभार स्वीकारल्यानंतर या बाबी निदर्शनास येताच त्यांनी कार्यालयातील कर्मचार्यांना आपल्या कामात सुधारणा करण्याचे निर्देश दिले.मात्र काहीच परिणाम झाला नाही.उलट सोमवार (28 ऑगस्ट) रोजी स्वतः वैभव वाघमारे आणि येथील नायब तहसीलदार कार्यालयात उपस्थित झाले मात्र,कर्मचारीच उशिरा आले होते.
राज्यसरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना केवळ पाच दिवस कार्यालयात काम करावयाचे आहे. त्यासाठी ठरवून दिलेल्या वेळांत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहणे गरजेचे असताना बरेच कर्मचारी उशिरा येणे आणि लवकर निघून जाणे, असा प्रकार सुरू आहे.मात्र,उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्वतः आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.या निर्णयामुळे उर्वरित इतर कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आता वठणीवर येथील अशी आशा सर्वमान्य माणसांत निर्माण झाली आहे.
कर्मचाऱ्यांचा कार्यालयाला केले सील
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी कर्मचाऱ्यांचा कार्यालय असलेल्या खोलीला सील केले आहे.येथे भेट दिली असता शिपाई उपस्थित होते.याबाबत माहिती मिळताच अहेरीतील विविध कार्यालयात एकच चर्चा रंगली असून या निर्णयामुळे लेटलतीफ कर्मचाऱ्यांमध्ये धडकी भरली हे विशेष.
कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा, कामात दिरंगाई,लेटलतीफपणामुळे कामा मधिल अनास्था,अकर्यक्षमता
आणि त्यांच्या टेबलावर असलेले प्रलंबित कामे बघता वारंवार सूचना देऊनही त्यांच्यात परिवर्तन होत नसल्याने नायब तहसीलदार वगळता येथील सर्वच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांचा कार्यालय असलेल्या खोलीला सील केले असून माझी पुढील कारवाई होताच सील काढण्यात येईल व कार्यालय पूर्ववत सुरू राहील.
-वैभव वाघमारे,
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,अहेरी