एटापल्ली: अतिदुर्गम व आदिवासीबहुल एटापल्ली तालुक्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांची निधी देण्यात येत आहे.मात्र अजूनही वीज,पाणी आणि रस्त्यांची समस्या पूर्णपणे सुटलेली नाही. स्थानिक आदिवासी बांधवांची तक्रार बघता ही अत्यंत खेदाची बाब आहे. निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेतली जाणार नाही.तालुक्याचा विकासासाठी निधीचा सदुपयोग करा असे स्पष्ट निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले.
शनिवार (२६ ऑगस्ट) रोजी स्थानिक उप विभागीय अधिकारी कार्यालय येथे पार पडलेल्या आढावा सभेत ते बोलत होते.यावेळी माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम,माजी प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,युवा नेते ऋतुराज हलगेकर, उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, तहसीलदार प्रवीण चौधरी,गटविकास अधिकारी मुकेश मोहोर आदी उपस्थित होते.
काही गावातील नागरिकांनी आढावा सभा अगोदरच वीज, पाणी आणि रस्त्यांची समस्या ना.आत्राम यांच्याकडे मांडली होती.आढावा सभेत वीज वितरण विभाग आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी चांगलेच धारेवर धरले व सविस्तर माहिती घेत दुसऱ्यांदा नागरिकांच्या समस्या माझ्यापर्यंत यायला नको त्यासाठी योग्य नियोजन करून अर्धवट कामे पूर्ण करा असे सक्तीचे निर्देश दिले.
ना.आत्राम यांनी सुरुवातीला एक-एक करून सर्वच विभागांचा आढावा घेतला. तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा निधीतून रस्त्यांचे कामे सुरू आहेत.मात्र बरेच कामे अर्धवट आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले. एवढेच नव्हे तर आदिवासीबहुल भागाचा कायापालट करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविले जात आहे. त्यासाठी खोट्यवधी रुपयांची तरतूद देखील केली जात आहे. मात्र,विकास कामांना गती देणे गरजेचे आहे.त्यासाठी विविध विभागांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी केले.