आलापल्ली:नूतन बसस्थानकामुळे या भागातील प्रवाशांची मोठी अडचण दूर झाली असून आता केवळ सुसज्ज बसस्थानकाची इमारत उभी झाली आहे.येथे विविध सोईसुविधा देणे गरजेचे आहे. संवरक्षण भिंती, सुशोभीकरण, शौचालय असे बरीच कामे प्रलंबित असून उर्वरित कामासाठी अतिरिक्त निधी देणार असल्याची ग्वाही कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली.अहेरी तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आलापल्ली येथील नूतन बस स्थानकाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम,माजी प.स.सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, जिल्हाधिकारी संजय मिणा,अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे, महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक सुताने,सरपंच शंकर मेश्राम,उपसरपंच विनोद अक्कनपल्लीवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना केवळ नूतन बस स्थानक उदघाटन करून चालणार नाही तर,मागील पंधरा वर्षापासून अहेरी आगारात एकही नवीन बस मिळाली नाही. येथील सर्व बसेसची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना बसमध्ये कधी हातात छत्री घेऊन बसावा लागते तर कधी मार्गस्थ बिघाडी मुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नवीन एसटी बसेस साठी 22 कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविले असून 55 बसेस घेणार असल्याची माहिती मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली.
आलापल्ली येथील बस स्थानकाचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आभासी पद्धतीने उदघाटन होणार होते.मात्र,काही कारणास्तव ते हजर राहू शकले नाही.अखेर जिल्हाधिकारी संजय मिणा यांच्या उपस्थितीत कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन संपन्न झाला.उदघाटन होताच मान्यवरांनी प्रत्येक खोली आणि परिसराची पाहणी केली.तसेच प्रवाशांना योग्य सुविधा देण्याचे निर्देश दिले.
दरम्यान बस स्थानक परिसरात माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचे आभार मानत असल्याचे बॅनर लावण्यात आले होते.त्यावरून कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आपले मत व्यक्त करताना विकास कामासाठी आलेल्या निधीतून चांगले काम होत असेल तर श्रेय घेण्याचा काहीच कारण नसून जनतेला योग्य सोयीसुविधा मिळावे हाच आपला उद्देश असायला पाहिजे. मागील अनेक वर्षांपासून आलापल्ली येथे बस स्थानक व्हावे ही या भागातील नागरिकांची मागणी होती.यासाठी सर्वच माजी आमदारांनी प्रयत्न केले असून यात सर्वांचाच मोलाचा वाटा आहे.मात्र जे कोणी पदावर असतात त्यांना उदघाटन, लोकार्पण करण्याचा हक्क असतो. माझ्या काळातही बरेच काम झाले मात्र,मी पदावर नसताना इतरांनी लोकार्पण केली,ही परंपराच आहे.जे रिबीन कापतात त्यांचाच नाव असतो असे ते म्हणाले.