गडचिरोली:घोट वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या गट्टा जंगल परिसरात सध्या वाघाचा मुक्तसंचार सुरू असून जंगलात चराईसाठी गेलेल्या एका गाईचा फडशा पडल्याची घटना २२ ऑगस्ट रोजी घडल्याने या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
मुलचेरा तालुका मुख्यालयापासून केवळ ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या गट्टा येथील केशव मुहुंदा यांच्या गाईवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या शेतीचे काम सुरू असून वाघाच्या भीतीमुळे शेतकरी शेतावर जाणे टाळल्याने शेतीचे कामे खोळंबली आहेत.याबाबत माहिती मिळताच घोट वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला आहे.
विशेष म्हणजे सदर घटनास्थळी आढळलेल्या पाऊलखुणा बघता वाघीण आपल्या २ पिलांसोबत या परिसरात दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.याबाबत घोटचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन एस वाढीघरे यांना विचारणा केली असता त्यांनी दुजोरा दिला आहे.हा परिसर म्हणजे घोट आणि पेडीगुडम दोन वन परिक्षेत्राची हद्द असल्याने या भागात दोन्ही वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून बॅनर लावून नागरिकांना अलर्ट करण्यात आला आहे.एवढेच नव्हेतर गावागावात सभा घेऊन रात्री अपरात्री बाहेर निघू नये असे आवाहन केल्याचे पेडीगुडमचे वन परिक्षेत्र अधिकारी भावना अलोने यांनी सांगितले.असे असलेतरी वन विभागाने ट्रॅप कॅमेरे लावून त्वरित वाघाला जेरबंद करा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
जीवितहानी झाल्यास अधिकाऱ्यांना घेराव घालणार:रियाज शेख यांचा ईशारा
या घटनेची माहिती मिळताच शिवसेना जिल्हा प्रमुख रियाज शेख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी गट्टा गाव गाठून केशव मुहुंदा यांच्या घरी भेट देऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली.परिसरातील नागरिकांशी संवाद साधले.वाघाच्या भीतीमुळे बोलेपल्ली,हेटळकसा, देवदा,सुरगाव,पुल्लीगुडम,गरंजी आणि रेगडी तसेच एटापल्ली तालुक्यातील चंदनवेली या गावातील शेतकऱ्यांनी प्रचंड दहशतीत असल्याचे कळले.रवढेच नव्हेतर शेतीचे कामे ठप्प असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.दुचाकीस्वार सुद्धा प्रचंड दाहशतीत आहेत.त्यामुळे वाघाला त्वरित जेरबंद करा अन्यथा नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना घेराव घालण्याचा ईशारा त्यांनी दिला आहे.यावेळी त्यांच्यासोबत परिसरातील शिवसैनिक उपस्थित होते.