गडचिरोली:भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या जनसंवाद कार्यक्रम अर्थात महाविजय-२०२४ करीता प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे २३ ऑगस्ट रोजी गडचिरोलीत येत असुन विविध कार्यक्रमांचे माध्यमातून ते कार्यकर्ते आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती गडचिरोली – चिमुर लोकसभेचे खासदार अशोक नेते यांनी सोमवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
खासदार नेते यांनी सांगितले की सकाळी १०:३० वाजता प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे गडचिरोलीत आगमन झाल्यानंतर त्रिमूर्ती चौक ते घिसुलाल काबरा यांचे घरापर्यंत पायी चालत परिसरातील मान्यवर नागरिकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर शहरातील सुमानंद हॉल मध्ये अहेरी, गडचिरोली आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रातील बुथप्रमुख, शक्ती प्रमुख ते जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील. त्यांच्या कामाचा आढावा घेतील. त्यानंतर खासदार अशोक नेते याच्या लोकसभा-२०२४ च्या निवडणूक वॉर रूम आणि शिवकृपा मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या नव्या ब्रांच चे उद्घाटन करणार आहेत.
या सर्व कार्यक्रमांना उपस्थित रहावे अशी विनंती खा. नेते यांनी केली आहे. पत्रकार परिषदेला भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, शेतकरी नेते रमेश भूरसे, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, स्वप्नील वरघंटे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, सचिव केशव निंबोड यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.