गडचिरोली:- वाघांची शिकार करून त्यांच्या अवयवांची विल्हेवाट लावणाऱ्या आंतरराज्य टोळीला गडचिरोली जिल्हा मुख्यालय नजीक आंबेशिवणी येथे अटक करण्यात आली आहे. ही टोळी आंबेशिवणी गावात एका झोपडीत राहत असून त्या झोपडी मध्ये 3 वाघाचे नखे, धारदार शस्त्र, शिकंजे ट्रप व 46 हजार रुपये रोख आढळून आली. सर्व साहित्य वनविभागाने जप्त केले आहे. ही कारवाई रविवारी (23 जुलै) रात्री 2 वाजताच्या सुमारास मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर व गडचिरोली वनवृत्ताने संयुक्तरीत्या केली.
28 जून 2023 रोजी गुवाहाटी, आसाम राज्यात पोलीस विभाग व वन विभाग आसाम यांच्या संयुक्त कारवाईत वाघाच्या शिकार प्रकरणी राज्यातील बावरिया जमातीच्या तीन व्यक्तींना वाघाची कातडी व हाडांसह अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून प्राप्त प्राथमिक माहितीच्या आधारे ‘वाइल्ड लाईफ कंट्रोल ब्युरो’ वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो, नवी दिल्ली यांनी देशातील सर्व व्याघ्र प्रकल्पांच्या सभोवताल क्षेत्रात करिता वाघांच्या शिकारीची शक्यता असल्याचे 29 जून रोजी अंदाज वर्तविला. त्यानुसार शिकाऱ्यांनी चंद्रपूर व गडचिरोली परिसरात शिकार केली असल्याची माहिती पडताळणी दरम्यान व गुप्त माहितीच्या आधारे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक यांचे तीन सदस्य पथक गुवाहाटी येथे रवाना झाले. या पथकाने गुवाहाटी येथे कारागृहात असलेल्या आरोपींची चौकशी केली असता शिकारीतोडीतील काही सदस्य गडचिरोली वनविभागाच्या क्षेत्रात असल्याची माहिती समोर आली. या आधारे सर्व संशयीतांवर पोलीस विभागाने नजर ठेवली होती त्यांना जेरबंद करण्यासाठी मेळघाट, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तसेच चंद्रपूर व गडचिरोली वनवृत्ताने कारवाई करून रविवारी रात्रीच्या सुमारास अटक केली. गडचिरोली नजीकच्या आंबे शिवणी गावात एका झोपडीत राहत असलेल्या या संशयीतामध्ये 6 पुरुष 5 महिला व 5 लहान मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या संशयीतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे करीमनगर (तेलंगाना) धुळे (महाराष्ट्र) येथून आणखी संशयीतांना ताब्यात घेण्यात आली आहे.
हे संशयित हरियाणा व पंजाब राज्यातील रहिवासी आहेत. गडचिरोली जिल्ह्यात तीन-चार वर्षांपूर्वी आंबेशिवणी धुंडेशिवणी, राजगाटा चक्र, अमीरझा या भागात प्रचंड वाघांची दहशत होती. कालांतराने या परिसरातील वाघांचे दर्शन होणे कमी झाले होते. त्यामुळे या वाघांची शिकार याच तोडीने केल्याचा संशय बळावला आहे. आंबेशिवणी झोपडी मध्ये राहणाऱ्या या टोळीकडे 3 वाघांची नखे व शिकारीसाठी लागणारे साहित्य मिळून आल्याने या टोडीनेच वाघांची शिकार केली असावी या चर्चेला पेव फुटले आहे.
ही कारवाई राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) माहित गुप्ता यांचे मार्गदर्शनात अमरावती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ज्योती बॅनर्जी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर, गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक रमेश कुमार,चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पाल, उपसंचालक (बफर) कुशाग्र पाठक, उपसंचालक (कोर) नंदकिशोर काळे, गडचिरोलीचे उपवनसंरक्षक निलेश दत्त शर्मा, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे सहाय्यक वनसंरक्षक बापू येळे, गडचिरोलीचे सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके, मुलचे वनपरिक्षेत्राधिकारी नायगावकर, वरोराचे वनक्षेत्राधिकारी सतीश शेंडे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सायबर सेलचे आकाश सारडा, मुकेश जावरकर,दिनेश केंद्रे व स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी केली.