गडचिरोली:- मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यासह आता मुलचेरा तालुक्याचाही संपर्क तुटला आहे.कोपरअली येथील दीना आणि गोमनी नाल्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने आलापल्ली-मुलचेरा-आष्टी मार्गावर रहदारी ठप्प झाली आहे.
काल रात्रीपासून दक्षिण गडचिरोलीत मुसळधार पाऊस सुरू आहे. दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असले तरी जिल्ह्यातील सर्वच नदी नाले तुडुंब भरून वाहत असून सर्वच नदी, नाले धोक्याची पातळी ओलांडले आहे.मुलचेरा तालुका मुख्यालयातून म्हणजेच अगदी दोन किलोमीटर अंतरावरून दीना नदी वाहते या नदीला पूर आल्याने आष्टी ते मुलचेरा हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. एवढेच नव्हे तर तालुक्यातील गोमणी गावालगत वाहणाऱ्या नाल्याला पूर आल्याने येथील पूल अक्षरशः पाण्याखाली गेल्याने आलापल्ली-मुलचेरा मार्ग बंद आहे.
सध्या गोसेखुर्द धरणाच्या 38 पैकी 29 गेट उघडलेले असून यातून 3299 क्यूमॅक्स विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेजरेचे 38 पैकी 38 गेट सुरू असून 7867 क्युनेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या विसर्गामुळे वैनगंगा व प्राणहिता नदीची पाणीपातळी वाढणार असल्याने नदी काठावरील गावातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मुलचेरा तालुक्यात पूरपरिस्थिती असल्याने तालुका प्रशासन सुद्धा सज्ज झाले असून पुलावरून पाणी वाहत असताना रस्ता ओलांडू नये असा इशारा देण्यात आला असून महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.
*पूरामुळे बंद झालेल्या मार्गांची स्थिती*
1. अहेरी ते मुलचेरा मार्ग (गोमनी नाला)
2. खुदरामपल्ली आणि कोपरअल्ली मार्ग
3. एटापल्ली नाक्या समोरील मार्ग
4. बोलेपल्ली मार्ग (गेदा जवळ)
5. पाविमुरंडा च्या जवळील नाल्यावरील मार्ग
6. चामोर्शी ते माक्केपाली मार्ग (मछली नाला)
7. पोटेगाव च्या समोरील मार्ग
8. आलापल्ली ते भामरागड राष्ट्रिय महामार्ग (पर्लकोटा नदी)