गडचिरोली:मुलचेरा तालुक्यातील विवेकानंदपूर येथील रहिवासी असलेली कु निरुपमा कुमारेश मंडल हिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे २६ मार्च २०२३ ला घेण्यात आलेल्या आणि नुकताच निकाल लागलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता घेण्यात आलेल्या राज्यपात्रता परीक्षा २०२३ अर्थात सेट परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात जीवशास्त्र विषयात यश संपादन केले.
निरुपमा मंडलचे वडील मुलचेरा पंचायत समिती मध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते.मागील शैक्षणिक सत्रात सेवानिवृत्त झाले.निरुपमा ही त्यांची एकुलती एक मुलगी असून लहानपणा पासून ती अभ्यासात हुशार होती.तीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आष्टी येथे झाले.तिचे उच्च माध्यमिकचे शिक्षण नेताजी सुभाषचंद्र हायस्कुल,सुंदरनगर येथे झाले.त्यानंतर वनवैभव शिक्षण मंडळ द्वारा संचालित नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा येथे तिने बीएस्सी पूर्ण केले.तर,नागपूर विद्यापीठातून एमएस्सी पूर्ण केले.
जीवशास्त्र विषय हा विज्ञान शाखेत सर्वात कठीण समजला जातो.मात्र,तिची अभ्यासातील जिद्द आणि अथक परिश्रमाने तिने पहिल्याच प्रयत्नात सेट परीक्षेत यश संपादन करून गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून तिचे कौतुक केले जात आहे. निरुपमाने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि शिक्षकांना दिले आहे.तर पुढे पीएचडी पूर्ण करणार असल्याचे तिने सांगितले आहे.
विज्ञान महाविद्यालय तर्फे सत्कार
निरुपमा कुमारेश मंडल ही नेताजी सुभाषचंद्र बोस विज्ञान महाविद्यालय मुलचेरा येथील माजी विद्यार्थिनी असून तिने सेट परीक्षा पास केल्याची माहिती मिळताच नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेराचे प्राचार्य डॉ रंजीत मंडल यांनी निरुपमा मंडल यांना महाविद्यालयात पाचारण करून तिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी तिचे वडील सेवानिवृत्त शिक्षक कुमारेश मंडल आणि नेताजी सुभाषचंद्र बोस विज्ञान महाविद्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.