गडचिरोली:- उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्ट्यांचा कालावधी नंतर पुन्हा एकदा विदर्भातील संपूर्ण शाळा 30 जून पासून सुरू होणार आहेत.विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील विविध शाळांमध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने चिमुकल्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील 1096 प्राथमिक तर 397 उच्च प्राथमिक असे 1493 जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील बाराही तालुक्यातील शिक्षक सज्ज झाले आहेत.
वाढत्या तापमानामुळे राज्यातील सर्व शाळांना 21 एप्रिल पासून सुट्ट्या जाहीर करण्यात आले होते. राज्यातील काही शाळांना 15 जूनला सुरू झाल्या.तर, विदर्भातील उष्णतेची तीव्रता लक्षात घेता या ठिकाणी शाळा 30 जून पासून सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे आज बहुतेक घरामध्ये सकाळच्या तयारीमध्ये लगबग जरा जास्तच दिसून येत आहे. अनेक चिमुकल्यांचे तर आज पहिले पाऊल औपचारिक रित्या शिक्षण प्रवाहामध्ये पडणार आहे. हे पाहिले पाऊल दमदार आणि सुखावाह होण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळा सज्ज झाल्या आहेत.
शाळेच्या पहिल्याच दिवशी होणार गणवेश आणि पाठ्यपुस्तके वितरण
शाळेत पहिल्यांदाच येणाऱ्या मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण व्हावी. या विचाराने राज्यात “पहिले पाऊल” शाळा पूर्वतयारी अभियान हाती घेण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शाळेत विविध उपक्रम आटोपल्यानंतर लगेच विद्यार्थ्यांना शालेय गणवेश तसेच पाठ्यपुस्तके उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी या अगोदरच नियोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक तालुक्यात वरिष्ठ अधिकारी होणार दाखल
इयत्ता पहिलीत दाखल पात्र बालकांसाठी शाळा पूर्वतयारी अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. बालकांना शाळेत प्रवेश घेताना उत्साहवर्धक व आनंददायी वातावरण दिसले तर त्यांचा शाळेकडे ओढा अधिक वाढेल म्हणून या पार्श्वभूमीवर सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात 30 जून रोजी प्रत्येक शाळेत “प्रवेशोत्सव” कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. नव्याने प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बाराही तालुक्यात प्रवेशोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता, कृषी विकास अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, प्राथमिक शिक्षण अधिकारी, माध्यमिक शिक्षण अधिकारी या सर्व अधिकाऱ्यांना प्रवेशोत्सव कार्यक्रमात सहभागी होण्यास आदेशीत केले होते.त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुक्यात वरील अधिकारी निवडून दिलेल्या तालुक्यात उपस्थित राहणार हे विशेष.
प्रवेशोत्सावासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलले शुभेच्छा
शाळा पूर्वतयारी बाबत सहभाग घेऊन शाळा स्तरावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तके, शालेय पोषण आहार, गणवेश निधी इत्यादी वितरित करण्यात आले आहे. 2023-24 वर्षातील विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस, शाळा प्रवेशित विद्यार्थी स्वागतासाठीच्या या “पुन्हा शाळा सुरू आनंदोत्सव” निमित्य शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच जिल्हास्तरावरील अधिकारी यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आवाहन करतानाच सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छाही दिले आहे.