गडचिरोली:- जिल्ह्यातील प्रस्तावित सहा लोहखाणी रद्द कराव्या, या प्रमुख मागणीसह आदी मागण्या घेऊन तब्बल तीन महिन्यापासून छत्तीसगड सीमेवरील तोडगट्टा गावात सुरू असलेल्या आदिवासींच्या आंदोलनाला अहेरी विधानसभा क्षेत्राचे आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी रविवारी 11 जून रोजी भेट दिली.यावेळी माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम,राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम,माजी जि प सदस्य ज्ञानकुमारी कौशी,माजी पं स सभापती बेबीताई नरोटे आदी उपस्थित होते.
एटापल्ली तालुका मुख्यालयापासून 60 किलोमीटर अंतरावरील व छत्तीसगड सीमेलगत असलेल्या तोडगट्टा गावात 9 मार्च पासून ग्रामसभेमार्फत आंदोलन सुरू आहे.जिल्ह्यातील प्रस्तावित सहा लोहखाणींसह दमकोंडवाही लोहखाणीला ग्रामसभांचा विरोध आहे.प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार येथील नागरिकांनी घेतला आहे.मात्र, शासन आणि प्रशासनाने कुठलीही भूमिका न घेतल्याने तब्बल तीन महिन्यापासून आंदोलन सुरूच आहे.
अखेर अहेरी विधानसभा क्षेत्राचे आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी येथे भेट देऊन नागरिकांशी त्यांनी संवाद साधून समस्या जाणून घेतली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपले म्हणणे मांडले.त्यात यापूर्वीच दिलेल्या निवेदनातील मागण्यांवर प्रशासन ठोस भूमिका घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा सुरू निघाला. यावेळी माजी जि प सदस्य सैनू गोटासह आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जवळजवळ 91 दिवसांपासून आदिवासी बांधव ठिय्या आंदोलनाला बसले आहेत.मागेच दिलेल्या निवेदनानुसार जिल्ह्यातील प्रस्तावित सहा लोहखाणीसह दमकोंडवाही लोहखाणीला ग्रामसभांचा विरोध आहे.ते रद्द करण्यात यावा यांसह आदी मागण्या आहेत.लोकप्रतिनिधी म्हणून त्याला माझं समर्थन आहे.लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेटून निवेदनातील मागण्या त्यांच्यासमोर मांडणार आहे.
-आ.धर्मराव बाबा आत्राम,अहेरी विधानसभा क्षेत्र