गडचिरोली:- मौजा तोडगट्टा येथील जनआंदोलनासाठी नक्षलवाद्यांनी नागरीकांना बळजबरी सहभागी होण्यास भाग पाडले आहे असे नक्षवाद्यांनी नुकत्याच टाकलेल्या पत्रकातून सिध्द होते. हैराण झालेल्या नागरीकांना आणखी फुस लावून आंदोलन कायम ठेवण्याच्या हेतुने तसेच पोलीसांव्दारे राबविण्यात येणा-या नक्षलविरोधी अभियान दरम्यान मोठा घातपात करण्याची योजना नक्षलवाद्यांकडुन आखली जात आहे अशा खात्रीशिर माहिती वरुन गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष अभियान पथकांच्या जवानांनी त्या भागात शोध अभियान राबविले असता, आज १ एप्रिलला सकाळी १०:०० वाजेच्या सुमारास उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या गट्टा (जां.) हद्दीतील मौजा हिक्केर जंगल परिसरातील पहाडीवर सुमारे ६० ते ७० नक्षलवाद्यांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने बीजीएल व इतर दारुगोळ्याच्या साह्याने तीव्र स्वरुपात अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी पोलीसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवून शरण येणे बाबत आवाहन केले असता, नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलीसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वरक्षणासाठी नक्षलवादयांच्या दिशेने गोळीबार केला. सदरची चकमक ही सुमारे ३० ते ४५ मिनीटे चालु होती. पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर ०१ पुरुष नक्षल मृतदेह आढळून आले. मृत नक्षलीची ओळख पटली असून त्याचे नाव समीर ऊर्फ साधु लिंगा मोहंदा, वय ३१ वर्षे, रा. तुमरकोडी, पोमकें कोठी, तह. भामरागड जि. गडचिरोली येथील रहीवासी होता. त्याच्यावर आजपावेतो २ चकमक व २ इतर असे ४ गुन्हे दाखल असून, त्यामध्ये पोस्टे भामरागड येथे सन २०१८ साली पोलीसांना जिवे मारण्यासाठी ॲम्बुश लावणे यासाठी देखील गुन्हा दाखल आहे. सदर नक्षल सन २०१४-१५ साली चातगाव दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन २०१७ साली प्लाटुन क्र. ७ मध्ये भास्कर चा सुरक्षा गार्ड होता. तसेच सन २०१८ साली कंपनी ४ मध्ये कार्यरत होता व त्यानंतर कंपनी क्रमांक १० मध्ये कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने २ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
घटनास्थळावर ०१ नग देशी बनावटीची रायफल, ०१ नग भरमार रायफल, १ नग ३०३ रायफल, ब्लास्टींगचे साहित्य, एसएलआर च्या २ मॅगझिन व ३० राऊंड्स, ८ एम.एम. रायफलचे ३ राऊंड्स, १२ बोर चे ४ राउंड्स, २ पिट्टु, भरपुर प्रमाणात नक्षल लिखाण साहित्य, १ सॅमसंग कंपनीचा टॅब्लेट, १ रेडिओ, रोख रक्कम रुपये ३८,१२०/-, नक्षल कपडे, व ईतर नक्षल साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे. सदर जंगल परिसरात सी-६० पथकांच्या जवानांचे नक्षलविरोधी अभियान आणखी सुरु असुन, जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहिम राबविण्यात येत आहे. गडचिरोली पोलीस दलाकडुन गुन्हा नोंद करण्यासंबंधीची प्रक्रिया सुरु असुन पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे.
सदर अभियान पोलीस अधीक्षक नीलोत्पल अपर पोलीस अधीक्षक (अभियान) तारे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता व अपर पोलीस अधीक्षक अनुज (अहेरी) यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून, सी-६० कमांडोच्या या शीर्यपूर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतुक केले. तसेच नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून सर्व नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण होऊन आपले जिवनमान उंचाविण्याचे आवाहन केले आहे.