गडचिरोली:मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात गो तस्करीचा गोरख धंदा सुरू आहे.यावर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात कडक कारवाई केली जात आहे.मात्र,तस्कर विविध मार्गांचा अवलंब करून चक्क तेलंगाणा राज्यात कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असताना दिसत आहेत.अशीच एक गो तस्करीची घटना समोर आली असून नुकतेच रेपणपल्ली पोलिसांनी गो तस्करांचा मुसक्या आवळत तब्बल ७ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिसांनी तेलंगाणा राज्यातील एका आरोपीला ताब्यात घेतले असून वामनकुमार बापू सिपेली (२०) रा.जनगाम, ता. कोटापल्ली, जि-मंचेरियाल असे त्या आरोपीचे नाव आहे.
आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर रेपणपल्ली उप पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक दुर्गम व अतिसंवेदनशील गावांचा समावेश आहे.छत्तीसगड राज्याची सीमा लागून असून हा परिसर नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो.याचाच फायदा घेत या भागातून चक्क तेलंगाणा राज्यात गो तस्करी केली जात आहे.यापूर्वी देखील रेपणपल्ली पोलिसांनी धडक कारवाई करत यावर आळा घालण्याचा प्रयत्न केला.मात्र,गो तस्करी सुरूच आहे.२८ सप्टेंबर रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचत टीएस-२ युसी-४०७१ क्रमांकाच्या पीकअप वाहनातून ५ जनावरांची सुटका केली.यात त्यांनी ३५ हजार किंमत असलेली ५ जनावरे व ७ लाख रुपये किमतीची पिकअप वाहन असे एकूण ७ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई उप विभागीय पोलीस अधिकारी शशिकांत दसुरकर यांच्या मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी संतोष काजळे यांनी केली तर पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रियंका मेश्राम करीत आहे.
रेपणपल्ली पोलिसांची सलग दुसरी कारवाई
२८ सप्टेंबर रोजी रेपणपल्ली पोलिसांनी याच राष्ट्रीय महामार्गावर अवैध दारू वाहतूक करणाऱ्या एका ट्रकवर धडक कारवाई करत १७ लाख ५७ हजार रुपयांचा देशी-विदेशी दारू व वाहतुकीकरिता वापरण्यात आलेली ट्रक अंदाजे ८ लाख रुपये असा एकूण २५ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करत दोन आरोपींना ताब्यात घेतली.त्यांनतर तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी जाणाऱ्या वाहनातून जनावरांची सुटका केली.यातही त्यांनी ७ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
अवैध दारू वाहतूक व विक्री वर आळा घालण्यासाठी रेपणपल्ली पोलीस सज्ज असून जनावरांची तस्करीसाठी मदत करणाऱ्यावर देखील कडक कारवाई केली जाणार आहे.त्यामुळे अश्या लोकांना कुणीही स्थानिकांनी मदत करू नये.
-संतोष काजळे-प्रभारी अधिकारी,रेपणपल्ली