गडचिरोली:दमदार पावसाने हजेरी लावल्यावर शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. शेतकरी आपल्या शेतात रोवणी करताना दिसून येत आहेत. नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्याकरिता गेलेले अहेरीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी भाताची रोवणी आणि त्याआधी शेताची मशागत याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. तंत्रज्ञानातील बदल समजून घेऊन शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.अहेरी तालुक्यातील मोदुमतुरा,इंदाराम परिसरात त्यांनी प्रत्यक्ष रोवणी केला. त्यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार तालुका कृषी अधिकारी संदेश खरात तसेच कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
इंदाराम येथील एका शेतात त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बांधावर पोहोचले. त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधत माहिती जाणून घेतली. तसेच त्यांनी स्वतः धानाच्या बांधीत उतरून रोप लावणी केली. एवढेच नव्हे तर या ठिकाणी बैलांच्या मदतीने चिखलणी करण्याचे काम सुरू असताना त्यांनी त्याचेही प्रात्यक्षिक करून बघितले. स्वतः अपर जिल्हाधिकारी चिखलात उतरून रोवणी आणि चिखलणी करण्याच्या प्रक्रियेत स्वतः सहभाग घेतल्याने शेतकरी आश्चर्यचकित झाले.
पट्टा पद्धतीने भात लागवड करण्याचे आवाहन
भात शेतीमध्ये पारंपारिक लागवड केली जाते.त्यामुळे दोन रोपा मधलं अंतर कमी असल्याने फुटवे फुटत नाहीत आणि त्यामुळे उत्पादकता कमी येते.पट्टा पद्धतीमध्ये अगदी 30 सेंटीमीटर अंतरावर एक ओळ मध्ये भात रोवणी केली तर पवारणी व्यवस्थित करता येईल आणि तण काढणी देखील सोयीस्कर होईल त्यामुळे पारंपारिक पद्धतीपेक्षा पट्टा पद्धतीमध्ये उत्पादकता जास्त येईल.
-आनंद गंजेवार, उपविभागीय कृषी अधिकारी अहेरी