चंद्रपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज ३० डिसेंबरला चंद्रपूर व मूल तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट देवून मतदार नोंदणी प्रक्रीयेचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी चंद्रपूर विधानसभा मतदार क्षेत्रातील मतदान केंद्र क्रमांक 129 व 131 तसेच मूल येथील मतदान केंद्र क्रमांक 102 व 103 येथील मतदान केंद्रावरील सुविधांचे निरिक्षण करून आवश्यक किमान सुविधा उपलब्ध करण्याचे व या कामात येणाऱ्या अडचणींबाबत अहवाल देण्याचे सांगितले. याप्रसंगी त्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून मतदाराचे छायाचित्र व नावांची अचूक नोंदणी होत आहे का याबाबत भौतिक पडताळणी करून खात्री करण्याच्या सूचना दिल्या व पात्र व्यक्ती मतदार नोंदीपासून वंचित राहू नये व मतदार यादी अचूक करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी विनय गौडा यांचेसोबत, सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., तहसीलदार विजय पवार नायब तहसीलदार किशोर साळवे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते.