गडचिरोली :- ग्रामसभा प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामसभांची आर्थिक क्षमता वाढवून गावातच रोजगार निर्मिती करणे व आपल्या ग्रामसभेच्या जंगलाचे संवर्धन व संरक्षण करून गौण वनउपज संकलन व संग्रहण करणे, त्यावर प्रक्रिया करून विपणननाच्या माध्यमातून आपले जीवनमान उंचाविण्यासाठी ग्रामसभा प्रशिक्षण कार्यक्रम महत्वाचा आहे. ग्रामसभा प्रशिक्षण कार्यक्रम आपल्या जीवन जगण्याशी सबंधित प्रशिक्षण आहे. असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी भामरागड येथे आयोजित ग्रामसभा प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमात केले.
ते पुढे म्हणाले की,स्वातंत्र पूर्व काळात ब्रिटिशांनी वेगवेगळ्या कायद्याद्वारे आदिवासींच्या हक्कांवर बंधने आणलीत, त्या विरोधात व स्वातंत्र्यासाठी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके, भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासींच्या हक्कासाठी खूप संघर्ष केला. त्यांचे कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. असेही ते म्हणाले .
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली व जिल्हा प्रशासन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने लोक सहभागातून ग्रामसभा सक्षमिकरण कार्यक्रम प्रशिक्षणाच्या ४४ व्या बॅचचे भामरागड येथील आदिवासी मुलांचे वसतिगृह येथे सात दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात भामरागड तालुक्यातील मलमपोडूर, इरापनार, कृष्णार, जुव्वी, हितापाडी, कोडपे, मिड्गुरवंचा, भुसेवाडा व तीरकामेठा या ग्रामसभेतील ५२ सदस्यांनी प्रशिक्षण घेतले. सदर सात दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप नुकताच पार पडला. या सात दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमात पंचायतराज कायदा, पेसा कायदा, सामुहिक वन हक्क कायदा, रोजगार हमी कायदा, जैव विविधता कायदा, गौण वन उपज संकलन, प्रक्रिया व विपणन, वन व्यवस्थापन आराखडा तयार करणे व ग्रामसभांशी सबंधित रेकार्ड आणि अंकेक्षण करणे या विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले. सात दिवसीय प्रशिक्षणात विजय देठे, राजेश शंभरकर, डॉ. कुंदन दुपारे, डॉ. रुपेन्द्रकुमार गौर, कामेश भोरजोरे, डॉ. सतीश गोगुलवार, डॉ. अमित्त सेटिया आदींनी मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमाला गोंडवाना विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी भास्कर पठारे, प्राचार्य डॉ.लाड उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन ग्रामसभा सहयोगी मित्र रमेश गावडे तर आभार प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. नरेश मडावी यांनी मानले.